अन्यायाविरूद्ध कुणबी समाजाने संघटित व्हावे
By Admin | Updated: January 16, 2017 00:54 IST2017-01-16T00:54:59+5:302017-01-16T00:54:59+5:30
धनगर समाजाने जातीचा फायदा करून घेतला. तसेच कुणबी समाजाने एकत्र येऊन लढले पाहिजेत.

अन्यायाविरूद्ध कुणबी समाजाने संघटित व्हावे
सुरेश साबळे यांचे आवाहन : आष्टीत कुणबी समाज मेळावा, शेकडो पदाधिकाऱ्यांसह हजारो बांधवांची उपस्थिती
आष्टी : धनगर समाजाने जातीचा फायदा करून घेतला. तसेच कुणबी समाजाने एकत्र येऊन लढले पाहिजेत. कुणबी समाजाचा अभिमान असायला पाहिजे. कुणबी समाजातील सर्व पोटजाती विसरून ‘कुणबी’ या एकाच झेंड्याखाली येण्याची गरज आहे. कुणबी समाज एकत्र आल्यास दबाव गट निर्माण होईल. त्यामुळे अन्यायाविरूध्द लढण्यासाठी कुणबी समाज बांधवांनी संघटीत व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमानी कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश साबळे यांनी केले.
आष्टी येथील साई मंदिरात रविवारी कुणबी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर संघटनेचे कोकण विभाग प्रमुख अनंत सिकाप, सचिव मधुकर सोनकर, दत्तात्रय घाणेकर, विदर्भ प्रमुख अमोल गोहाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला आष्टी, इल्लूर, सिरोंचापासून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व भागातून कुणबी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आष्टी व इल्लूर येथील कुणबी समाज बांधवांनी सहकार्य केले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही कुणबी समाजाच्या समस्यांवर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)
पुढील मुख्यमंत्री कुणबी समाजाचा राहील
महाराष्ट्र स्वाभिमानी कुणबी संघटनेना ही विदर्भ मुंबईपासून सर्व महाराष्ट्रातील कुणबी बांधवांना एकत्र करण्यासाठी कार्य करीत आहे. मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. समाजाचा विकास व्हावा, यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात कुणबी समाजाला स्थान देण्यात यावे, यासाठी संघटनेमार्फत दबावही आणण्यात आला. महाराष्ट्रातील कुणबी संघटना मजबूत असलयास पुढील मुख्यमंत्री हा कुणबी समाजाचा राहिल, अशी अपेक्षा मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून यावेळी व्यक्त केली.