२२ वर पाणी पुरवठा योजना बंद

By Admin | Updated: March 9, 2016 02:18 IST2016-03-09T02:18:48+5:302016-03-09T02:18:48+5:30

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षात गडचिरोली तालुक्यात एकूण ३२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

Closed water supply scheme on 22nd | २२ वर पाणी पुरवठा योजना बंद

२२ वर पाणी पुरवठा योजना बंद


विद्युत पुरवठ्याचा अभाव : गडचिरोली तालुक्यात पाणी टंचाई तीव्र, अनेक योजनांचे काम अपूर्ण
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षात गडचिरोली तालुक्यात एकूण ३२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यापैकी नऊ नळ योजनेला विद्युत पुरवठा करण्यात आला नाही. सहा योजनेचे काम बंद आहे. तर काम पूर्ण होऊनही सात योजनेची चाचणी सुरू आहे. याशिवाय अनेक योजनेचे काम तांत्रिक कारणामुळे ठप्प पडले आहे. गडचिरोली तालुक्यात ३२ पैकी केवळ दोन योजनेचा पाणी पुरवठा सुरू आहे. तर आठ योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पाणी पुरवठा योजनेची विदारक स्थिती असून २२ वर पाणी योजना बंद असल्याने गडचिरोली तालुक्यात आतापासूनच पाणी टंचाईची समस्या प्रचंड तीव्र झाली आहे. मात्र प्रशासन सुस्त आहे. तर दुसरीकडे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे.
गडचिरोली तालुक्यात सन २०१४-१५ या वर्षात वार्षिक कृती आराखड्यांतर्गत एकूण १४ नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली. यापैकी खुर्सा व कनेरी येथील पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून पाणी पुरवठा सुरू करण्यात आले आहे. मारोडा, साखरा, वाकडी, मुडझा बुज. येथील कामे पूर्ण झाली असून चाचणी सुरू आहे. विशेष म्हणजे, मुडझा बुज. नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाकडून खासगी नळ जोडण्या करण्यात आल्या नाहीत. चुरचुरा माल, जेप्रा, खरपुंडी, मुरमाडी, हिरापूर, पोटेगाव या योजनांना अद्यापही विद्युत जोडणी करण्यात आली नाही. कोट्यवधी रूपयांचा निधी पाणी पुरवठा योजनेच्या कामावर फस्त झाला आहे. मात्र त्याचा उपयोग सध्या तरी गावातील नागरिकांना होत नसल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोलीतही पाण्यासाठी हाहाकार
वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या पाणी योजनेला अत्यल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी गडचिरोली शहरात गेल्या दीड महिन्यापासून दिवसातून केवळ एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. नदी पात्रातील विहिरीतील गाळ उपसणे, बंधारा बांधणे आदीसह इतर कामांची सुरूवात संबंधित कंत्राटदारांनी पाच ते सहा दिवसांपूर्वी केली आहे. सदर काम होण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाणी टंचाईच्या प्रखर झळा सोसाव्या लागणार आहेत.
पालिका प्रशासनाच्या लेटलतीफ कारभारामुळे गडचिरोली शहरात पहिल्यांदाच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

सहा पाणी योजनेचे काम बंद
सन २०१५-१६ वर्षात हाती घेण्यात आलेल्या १० पाणी योजनांपैकी सहा नळ योजनांचे काम बंद आहे. यामध्ये गुरवडा, धुंडेशिवणी, दिभना माल, राजगाटा चेक, कोटगल व पारडी कुपी यांचा समावेश आहे. तसेच मौशीखांब व विहिरगाव पाणी योजनेला विद्युत डिमांड प्राप्त आहे. पारडी कुपी पाणी योजनेच्या निधी खर्चात अफरातफरी झाली असल्याने यातील दोषींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात पाणी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत
वार्षीक कृती आराखडा सन २०१६-१७ अंतर्गत गडचिरोली पंचायत समितीमधील ग्रामपंचायत प्रशासनाने सात नळ पाणी पुरवठा योजना व एका साध्या विहिरीचे काम प्रस्तावित केले. मात्र सदर सर्वच कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. महादवाडी-कुऱ्हाडी, सावरगाव-पेटेडोंगरी, आंबेटोला, इंदाळा, मेंढा या पाच गावातील पाणी योजनेच्या कामास शासनाकडून अद्यापही मंजुरी मिळाली नाही तर कन्हाळगावातील साध्या विहिरीचे कामही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गोगाव व अमिर्झा या दोन पाणी योजनेच्या कामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाणी पुरवठा विभागाच्या विभागीय कार्यालयास सादर करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मंजुरी मिळाली नाही.

Web Title: Closed water supply scheme on 22nd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.