एटापल्लीत बंद, चक्काजाम, मोर्चा
By Admin | Updated: January 18, 2016 01:22 IST2016-01-18T01:22:37+5:302016-01-18T01:22:37+5:30
पोटच्या गोळयाचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने आई-वडिलांना मृत बालकास चक्क सात किलोमीटर ....

एटापल्लीत बंद, चक्काजाम, मोर्चा
आदिवासी बालकाचे मृत्यू प्रकरण : दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी
एटापल्ली : पोटच्या गोळयाचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने आई-वडिलांना मृत बालकास चक्क सात किलोमीटर खांद्यावर घेऊन जावे लागल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी रविवारी एटापल्लीत कडकडीत बंद पाळून धरणे व चक्काजाम आंदोलन केले. तसेच एटापल्लीच्या ग्रामीण रूग्णालयावर मोर्चा धडकला.
१३ जानेवारीला एटापल्ली तालुक्यातील तुमरगुडा येथील तोंदे मुरा पोटावी या गरीब आदिवासी इसमाचा संदीप नामक दहा वर्षीय एकुलता एक मुलगा एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्युमुखी पडला. त्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन न दिल्याने तोंदे पोटावी याने चक्क मृतदेह खांद्यावर घेऊन हंबरडा फोडत आपले गाव गाठले. या बाबतच्या बातम्या वृत्तपत्रात झळकताच आधी गडचिरोली येथील निवासी वैद्यकीय अधिकारी व त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकास चौकशीसाठी पाठविले. मात्र समाधान न झाल्याने रविवारी नागरिकांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एटापल्ली बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध केला. त्यानंतर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे बराच वेळपर्यंत वाहतूक ठप्प होती. नागरिकांनी मोर्चा नेऊन ग्रामीण रुग्णालयापुढे धरणेही दिले. संदीप पोटावीच्या मृत्यू प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, रिक्त पदे तत्काळ भरावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय चरडुके, नगर पंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, नगर पंचायत सदस्य तानाजी दुर्वा, किशन हिचामी, ज्ञानेश्वर रामटेके, माजी पंचायत समिती सदस्य रैनेंद्र येमला यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. (तालुका प्रतिनिधी)