जिमलगट्ट्यात चक्काजाम
By Admin | Updated: January 12, 2016 01:16 IST2016-01-12T01:16:44+5:302016-01-12T01:16:44+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे तालुका निर्माण करण्यात यावा व या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे,

जिमलगट्ट्यात चक्काजाम
तालुका निर्माण करण्याची मागणी : आलापल्ली-सिरोंचा मार्गावरची वाहतूक सहा तास ठप्प
जिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा येथे तालुका निर्माण करण्यात यावा व या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात यावे, यासाठी सर्व पक्षांतर्फे सोमवारी आलापल्ली-सिरोंचा मार्गावर जिमलगट्टा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पहाटे ६ वाजतापासून दुपारी १२ वाजेपर्यंत सहा तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे सदस्य ऋषी पोरतेट, श्रीनिवास गावडे, सरपंच सरिता गावडे यांनी केले. सकाळी ६ वाजताच्या सुमारास आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. परिसरातील ६७ गावातील नागरिक हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्याने आलापल्ली-सिरोंचा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजुला शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेत अहेरीचे तहसीलदार पुप्पलवार यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व तेथूनच जिल्हाधिकाऱ्यांशी आंदोलकांची भ्रमणध्वनीवरून चर्चा घडवून आणली.
यावेळी आपल्या सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर दुपारी १२ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनात तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत उपगनलावार, उपाध्यक्ष नारायण गजमलवार, मदना नैताम, सचिव संजय गज्जलवार, महेश मद्देर्लावार, नंदेश्वर मेश्राम, वहिद पठाण, पुलया वेलादी, राजेश ओलेटीवार, विकास यादावार, गोविंदराव सडमेक, तिरूपती अल्लुर, शंकरबाई पोरतेट, शब्बीर सय्यद, अशोक गजमलवार, सरोजना आत्राम, मलाजी आत्राम, शिताबाई वेलादी, नंदेश्वर मेश्राम, मुन्ना टेलर, यशवंत डोंगरे, माता पोरतेट, सुधाकर मुलकरी, बापू मडावी, सुरेश कोटावार, रंगम्मा तलांडी, वसंता पेंदाम, भगवान आत्राम, शंकर शेकुर्तीवार, चंदू जलेवार, प्रफुल शंभरकर, संजय मडावी, सागर पडगंटीवार, आनंद मिसाळ, स्वामी बोनगिरवार, सुनिल नाले, संदी चंदावार, सिताराम साकट, राकेश पोरतेट, राजाराम बोधनवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ऋषी पोरतेट म्हणाले की, जिमलगट्टा परिसर अतिशय दुर्गम भागात गणला जातो. कोंजेड, लोवा येथील नागरिकांना ८० किमी अंतर चालून तालुका मुख्यालयाला यावे लागते. त्यामुळे जिमलगट्टा येथे नवीन तालुका देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. एक महिन्याच्या आत मागणी मान्य न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
जिमलगट्टा येथे नवीन तालुका निर्माण करण्यात यावा, अहेरी तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करून प्रती हेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, जिमलगट्टा ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करून १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका देण्यात यावी, नरेगाचे काम तत्काळ सुरू करून परिसरातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, मंडळ कार्यालयात नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात यावी, जिमलगट्टा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्यात यावा, जिमलगट्टा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडून एटीएम सुविधा उपलब्ध करावी, आठवडी बाजाराकरिता शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, इंद्रावती नदीवर उपसा सिंचन योजना सुरू करावी, जिमलगट्टा येथे बसस्थानक मंजूर करावे, जिमलगट्टा परिसरात प्रत्येक गावात तलावाची निर्मिती करून सिंचनाची सोय करावी, शिक्षण व आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावी.
झनकारगोंदी फाट्यावर शेतकऱ्यांनी रोखला तीन तास रस्ता
कोरची : तालुक्यातील विविध गावातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी सरपंच संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ९ वाजतापासून झनकारगोंदी फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
कोरची तालुक्यात बंद असलेले बेडगाव, बोरी, मर्केकसा, कोटगुल, कोटरा, गॅरापत्ती सुरू करण्यात यावे, तालुक्यात फक्त कोरची, मसेली, बेतकाठी हे तीनच खरेदी केंद्र सुरू आहे. त्यामुळे इतर गावातील शेतकऱ्यांना धानविक्रीसाठी अडचणी निर्माण होत आहे. या बाबीला घेऊन कोरचीपासून चार किमी अंतरावर बेडगाव जवळील झनकारगोंदी फाट्यावर सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सरपंच संघटनेचे अध्यक्ष सीताराम हलामी, सरपंच हेमंत मानकर, नंदू वैरागडे, प्रतापसिंह गजभिये, शितल नैताम, राजेंद्र नैताम, अशोक गावतुरे यांनी केले. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कोरची यांनी आंदोलनकर्त्यांना मर्केकसा, बोरी व बेडगाव केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले. कोटगूल व गॅरापत्ती केंद्र आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय बोरूडे, नायब तहसीलदार हटवार, उपप्रादेशिक अधिकारी बारबनकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)