श्रमदानातून चांदाळात नाली सफाई
By Admin | Updated: May 17, 2015 02:12 IST2015-05-17T02:12:02+5:302015-05-17T02:12:02+5:30
तालुक्यातील चांदाळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून नाली सफाई केली.

श्रमदानातून चांदाळात नाली सफाई
गडचिरोली : तालुक्यातील चांदाळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून नाली सफाई केली. यामुळे ग्रामपंचायतीचे नाली सफाईचा खर्च वाचला आहे. चांदाळा ग्रामपंचायतीचा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी घेण्याची आवश्यकता आहे.
चांदाळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र गजानन मेश्राम यांनी सभा घेऊन सर्व ग्रा. पं. पदाधिकारी व गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. नाली उपसा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सभेत सांगितले. गावातील नाल्यांचा उपसा श्रमदानातून करण्यासाठी उपस्थित नागरिकांनी होकार दर्शविला. या सभेला उपसरपंच शालू गेडाम, ग्रा.पं. सदस्य सुभाष किरंगे, उषा गावडे, मुखरू डोंगरे, शानंदा कोराम, अशोक नैताम, वंदना तोरे, ललिता कोवासे आदी उपस्थित होते. सभेत ठरल्यानंतर गावातील नागरिक व ग्रा.पं. सदस्यांनी शुक्रवारी एकत्र येऊन श्रमदानातून गावातील नाल्यांचा उपसा केला.