गावात स्वच्छता मात्र रस्ते हागणदारीयुक्त
By Admin | Updated: December 4, 2014 23:09 IST2014-12-04T23:09:39+5:302014-12-04T23:09:39+5:30
परिसरातील अस्वच्छतेचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. स्वच्छतेमुळे रोगराई पासून सर्वसामान्यांना दूर ठेवता येईल़ यासाठी केंद्र शासनाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेकरिता

गावात स्वच्छता मात्र रस्ते हागणदारीयुक्त
देसाईगंज : परिसरातील अस्वच्छतेचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. स्वच्छतेमुळे रोगराई पासून सर्वसामान्यांना दूर ठेवता येईल़ यासाठी केंद्र शासनाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेकरिता संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविला. काही दिवसांकरिता गावे स्वच्छ झाली़ मात्र जन्मजात शौचासाठी गावाबाहेर जाण्याच्या सवयीमुळे गावाबाहेरील रस्ते मात्र अजूनही हागणदारी युक्त आहेत. ग्रामपंचायतीनी कठोर दंडात्मक कारवाई केल्याशिवाय जन्मजात सवय सुटणार नाही, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
स्वच्छ भारत अभियानामुळे गावागावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ यात अनेकांनी सहभाग घेऊन हातात झाडू घेतला. व स्वच्छतेविषयी जनजागृती केली़ याची फलश्रुती म्हणून बहुतांश गावात काही काळाकरिता मोठ्या अभिमानाने ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील कचरा नियोजित ठिकाणी जमा करून गावाबाहेर फेकण्यात आला़ मात्र हे सर्व करीत असतांना गावा बाहेरील रस्ते मात्र पूर्णपणे हागणदारी युक्त होते़ या कालावधीत कधी नव्हे एवढी दुर्दशा या रस्त्याची झाली आहे़ भारतीयांना मिळालेला अस्वच्छतेचा शाप या ठिकाणी देखील डोके वर काढून मानवी इच्छेवर जड झाला असेच म्हणावे लागेल़ ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. सदर चित्र ग्रामीण भागात नेहमीचेच झाले आहे़
शहरापासून तर ग्रामीण भागात मोठमोठ्यांचे अनुकरण करण्याचे वेड सर्वसामान्याना लागले आहे़ मात्र अनुकरण करतांना चांगल्या विचारांचे अनुकरण कोणीही करीत नसल्याचेच समाजात दिसत आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत करण्याकरिता हातात झाडू घेतला़ त्यानुसार प्रत्येकानी स्वच्छतेविषयी जागृत राहावे हा विचार समोर आला़ मात्र त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे सोडून फोटो सेशन करण्यात सर्वसामान्यांचा वेळ गेला. गावे स्वच्छ करीत असतांना गावाबाहेरील रस्ते सुध्दा स्वच्छ करावयाला पाहिजे़ रस्ते म्हणजे गावाचे दर्पण असल्याचे बोलले जाते़ मात्र गाव स्वच्छतेच्या हुरूपात बाहेरील रस्त्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही़ हागणदारीच्या उच्चाटनाकरिता ग्रामपंचायतींनी कठोर पावले उचलावयास पाहिजे़ मात्र जन्मजात सवयीमुळे ग्रामवासीयांवर कारवाई करण्यास ग्रामपंचायती उदासीन आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने हागणदारीमुक्त गाव मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. संपूर्ण स्वच्छतेकरिता सर्वसामान्यांच्या मानसिकतेमध्ये अमूलाग्र बदल घडविणे आवश्यक आहे़ मात्र सध्याचे चित्र पाहता सध्यातरी ते शक्य नाही असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामपंचायतने कठोर पावले उचलावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)