गुड्डीगुडम आश्रमशाळेत स्वच्छतेची ‘ऐसीतैशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:30 IST2017-08-18T00:29:58+5:302017-08-18T00:30:23+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चालविली जाते.

गुड्डीगुडम आश्रमशाळेत स्वच्छतेची ‘ऐसीतैशी’
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चालविली जाते. मात्र या आश्रमशाळेत चिखलाचे साम्राज्य असून स्वच्छतेची पुरती वाट लागली आहे. अस्वच्छतेमुळे या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाचे अधिकाºयांनी त्याकडे डोळेझाक चालविली आहे.
सदर आश्रमशाळेच्या दुरवस्थेकडे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप माजी पं. स. सदस्य गंगाराम आत्राम, माजी उपसरपंच आनंदराव पेंदाम, तंमुस अध्यक्ष संदीप सिडाम, इलियाज शेख, तिमरमचे सरपंच महेश मडावी, संजूूराव आत्राम आदींनी केला आहे.
१५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त वरील सर्व मान्यवर व पालक सदर शासकीय आश्रमशाळेत गेले असता, या शाळेतील दुरवस्था दिसून आली. सदर आश्रमशाळेतील स्वयंपाकगृहाजवळच चिखल साचल्याचे दिसून आले. उरलेले अन्न याच परिसरात टाकण्यात आल्याने दुर्गंधीही येत होती. विशेष म्हणजे मुलांच्या भोजनाची व्यवस्था याच परिसरात करण्यात आली असल्याचे दिसूून आले. गुड्डीगुडमपासून अहेरीचे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जवळच आहे. मात्र प्रकल्प कार्यालयातील एकही अधिकारी व कर्मचारी सदर शाळेला भेट देऊन येथील समस्या जाणून घेत नाही. त्यामुळे या आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो, असे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप सिडाम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
सदर आश्रमशाळेतील स्वयंपाकगृह साध्या शेडमध्येच आहे. या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर असतो. गुड्डीगुडम शासकीय आश्रमशाळेत स्वयंपाकगृहाची नवीन इमारत बांधण्यात यावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी मुख्यालयी राहून सेवा देण्याची सक्ती करावी, अशी मागणी माजी पं. स. सदस्य गंगाराम आत्राम, सरपंच महेश मडावी, माजी उपसरपंच आनंदराव पेंदाम, इलियाज शेख, संदीप सिडाम, संजूराव आत्राम, मोनेश पेंदाम, अनिल भावळे आदींसह ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.
अहेरी व आलापल्लीवरूनच कर्मचाºयांचे अप-डाऊन
अहेरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत गुड्डीगुडम येथील शासकीय आश्रमशाळेत अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यापैकी बहुतांश शिक्षक तसेच काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी गुड्डीगुडम येथे मुख्यालयी न राहता, अहेरी व आलापल्ली येथे वास्तव्याने राहतात. येथून दररोज गुड्डीगुडम येथे आश्रमशाळेच्या ठिकाणी जाऊन आपले कर्तव्य बजावतात. शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने विद्यार्थी व आश्रमशाळेच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकल्प कार्यालयातील एकही अधिकारी व कर्मचारी या आश्रमशाळेला भेट देत नसल्याने या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे चांगलेच फावले आहे.
गुड्डीगुडम येथील शासकीय आश्रमशाळेतील समस्यांबाबतची माहिती प्रकल्प कार्यालयास्तरावरील अधिकाºयांना दिली आहे. मात्र अद्यापही येथील समस्या मार्गी लावण्यात आल्या नाही. आता पुन्हा प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाºयांकडे पाठपुरावा करून आश्रमशाळेतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू.
- एम.ए. शिवणकर, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, गुड्डीगुडम