दहावीच्या विद्यार्थ्यांची होणार कलचाचणी
By Admin | Updated: February 9, 2017 01:34 IST2017-02-09T01:34:21+5:302017-02-09T01:34:21+5:30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची होणार कलचाचणी
गडचिरोली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासंदर्भात बरेच विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल विद्यार्थ्यांना व पालकांना अवगत व्हावा, यासाठी जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील शिक्षकांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी नागपूर विभागीय परीक्षा मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्य) चावरे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक विराज खराटे, प्रा. तम्मेवार, प्राचार्य कवठे उपस्थित होते. शासनातर्फे व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे विविध शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन व समुपदेशन करते. राज्यात जवळपास २२ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये असून त्यामध्ये ६५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी अंदाजे २ लाख ५० हजार शिक्षक कार्यरत आहेत. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई येथून व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील शिक्षक समुपदेशकांची संख्या ५३९ आहे. मानसशास्त्रीय कसोट्या पेपर-पेन्सिलच्या माध्यमातून घेतल्या जातात. विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता या पद्धतीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना देता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
ओएमईआर पद्धतीचा वापर
मानसशास्त्रीय कसोट्या तयार करून आॅनलाईन संगणक प्रणाली विकसीत करण्यात येईल. आॅनलाईन पद्धतीने कलचाचणी घेणे शक्य होणार नाही, अशा ठिकाणी आॅफलाईन पद्धतीने कलचाचणी घेण्यात येणार असून यासाठी ‘ओएमईआर’ पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.