शहरातील भूमिगत विद्युत लाईन बीएसएनएलच्या मुळावर
By Admin | Updated: May 31, 2015 01:15 IST2015-05-31T01:15:44+5:302015-05-31T01:15:44+5:30
शहरात चामोर्शी मार्गावर भूमीगत विद्युत लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे.

शहरातील भूमिगत विद्युत लाईन बीएसएनएलच्या मुळावर
गडचिरोली : शहरात चामोर्शी मार्गावर भूमीगत विद्युत लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम करताना त्याच ठिकाणी असलेले बीएसएनएलचे वायरही तुटत असल्याने बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना वायर दुरूस्तीचे काम करावे लागते. परिणामी याचा अतिरिक्त भूर्दंड व श्रम बीएसएनएलला करावा लागत आहे.
रस्त्याच्या बाजुला असलेली विद्युत खांब हटवून त्याऐवजी भूमीगत विद्युत वायर टाकण्याचे काम मागील चार महिन्यांपासून सुरू झाले आहे. हे सर्व करताना याच ठिकाणावरून गेलेले बीएसएनएलचे वायरही वेळोवेळी तुटत आहेत. ही समस्या मागील चार महिन्यांपासून बीएसएनएलला सतत भेडसावत आहे. यामुळे बीएसएनएलचे कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. याच ठिकाणावरून वायर गेले असल्याने भूमीगत खोदकाम करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
चार दिवसांपूर्वी एमएसईबी कार्यालयासमोर अशाच प्रकारे खोदकाम करताना वायर तुटला. आता हे वायर जोडण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. ते काम अजूनही पूर्ण झाले नाही. याचा फटका बीएसएनएलसह नागरिकांनाही बसत आहे.
शहरातील पाण्याची पाईपलाईन मुख्य रस्त्याच्या बाजुने टाकली आहे. याच ठिकाणावरून बीएसएनएलचे वायरही जमिनीतून टाकण्यात आले आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर संबंधित वार्डावासीयांना पाण्याचा पुरवठा कमी लागतो. त्याचबरोबर पाणी लिकेज झाल्याने त्या ठिकाणावरून डांबरही उखडण्याची शक्यता राहते. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने पाईपलाईन दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येते. गडचिरोली नगर परिषदेने स्वत:ची जेसीबी खरेदी केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने कमी खर्चात तत्काळ खोदकाम होऊन पाईपलाईन दुरूस्ती होते. त्यामुळे नगर परिषद प्रशासन जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करते. जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करताना जवळपास असलेले संपूर्ण वायर तुटतात.
शहरात कोणतेही भूमीगत काम सुरू झाल्यास त्याची पहिली झळ बीएसएनएलला बसत असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)