योगदिनासाठी शहर सजले
By Admin | Updated: June 21, 2015 02:05 IST2015-06-21T02:05:54+5:302015-06-21T02:05:54+5:30
संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केला आहे.

योगदिनासाठी शहर सजले
शाळा, महाविद्यालयही झाले सज्ज : शहरात लागले मोठे फलक
गडचिरोली : संयुक्त राष्ट्र महासभेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केला आहे. भारतात पहिल्यांदाच या निमित्ताने यंदा योगदिनाचे आयोजन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. योग दिन एकदिवसावर आला असल्याने शहरात विविध संघटना व शासन, भाजपच्या लोकप्रतिनिधीतर्फे योग दिनाच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर फलक लावण्यात आले आहे. रविवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातही अनेक तालुका मुख्यालयात व गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनेही या दृष्टीने पुढाकार घेतला असून शाळा, महाविद्यालय यांना योगदिन साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे योगदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्रत्येक तालुका मुख्यालयात गटसाधन केंद्रात शिक्षकांना बोलावून योग अभ्यासकांकडून त्यांना प्रात्यक्षिकाचे डोज देण्यात आले आहे. सकाळी ६ ते ८ या कालावधीत योगदिनाचे आयोजन करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिले आहे. तर गडचिरोली स्थित गोंडवाना विद्यापीठातही २१ जून रोजी आर्ट आॅफ लिव्हिंगचे शिक्षक अमोल दशमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. मुर्लीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते आदींसह कर्मचारी उपस्थित राहणार आहे. यावेळी सुर्यनमस्कार, योगासन, ध्यानसाधना आदींचे प्रशिक्षण सकाळी ७ ते ७.३५ या कालावधीत दिले जाणार असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पतंजली योग समितीच्या माध्यमातून योगासंदर्भात प्रशिक्षण व जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.
इंदिरा गांधी चौक फलकांनी सजला
योगदिनानिमित्त जनजागृतीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात योग जनजागृती फलक लावण्यात आले आहे. योगगुरू रामदेवबाबा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योगमुद्रा असलेली छायाचित्र या फलकावर लावण्यात आली आहे. तर पथदिव्यांच्या खांबांनासुद्धा योगाचे महत्त्व विषद करणारे फलक लावण्यात आले आहे. योगाचे फायदे सांगताना निरोगी आरोग्याचा मंत्रसुद्धा सांगण्यात आला आहे. योग कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास यांचे कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावागावात कामाला भिडले आहेत.
भाजप प्रणीत केंद्र व राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच योगदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खासदार, आमदार योगदिनानिमित्त जनतेमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या कामात आघाडीवर आहे. योग दिवसासाठी शुभेच्छा देण्याकरिता त्यांनी शहरात व तालुका मुख्यालयात मोठे होल्डिंग्ज लावलेले आहेत. रविवारी शिवाजी महाविद्यालयात प्रांगणात गडचिरोली येथे होणाऱ्या योगदिन महोत्सवात खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. सीईओ संपदा मेहता आदी सहभागी होणार आहेत.