नागरीकरणामुळे पशुधनावरही संक्रांत
By Admin | Updated: October 4, 2015 02:20 IST2015-10-04T02:20:16+5:302015-10-04T02:20:16+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘गावाकडे चला’ असा संदेश दिला होता. गाव विकसित व स्वयंपूर्ण झाली पाहिजे,....

नागरीकरणामुळे पशुधनावरही संक्रांत
दिन विशेष : शेती व्यवस्था दुष्काळाच्या गर्तेत अडकली
गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘गावाकडे चला’ असा संदेश दिला होता. गाव विकसित व स्वयंपूर्ण झाली पाहिजे, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न होते. परंतु आज परिस्थिती उलट झाली आहे. गाव ओस पडून शहर फुगू लागली आहेत. खेडेगावात राहून शेती करणे हा तोट्याचे धंदा होऊन बसला आहे. त्यामुळे आधीच्या पिढीने केलेली शेती त्याच पिढीचा नवा प्रतिनिधी करण्यास तयार नाही, ठेक्याने किंवा बटईने शेती देऊन त्यांनी शहराकडे धाव घेतली आहे. त्यामुळे गावागावात असलेले पशुधन आज प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे. पूर्वी घरोघरी दूध दुभत्याचा व्यवसाय भरभराटीला होता. घरोघरी गायी, म्हशी, बकऱ्या पाळल्या जात होत्या. गावागावात दूध मिळायचे. आज ग्रामीण भागातही दूध दुभत्याचा धंदा परवडेनासा झाला आहे. पशुधन वाढविण्यासाठी लागणारा खर्च झेपणारा नाही, अशी तक्रार शेतकरी करू लागले आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या जवळचे पशुधन विकून मोकळे होऊ लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व आदिवासीबहूल गावांमध्ये जनावरे पाळली जातात. मात्र त्यांचे दूध काढणे हे त्यांच्या भावनेला पटत नसल्याने अनेक जनावरे जंगलात दिवसभर चरत राहतात. शहरातही दुधाची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवते. याची भरपाई बाहेर जिल्ह्यातून दूध आणून केली जात आहे. पशुसंवर्धन विभाग रिक्तपदांच्या ओझ्यातच दबला असून अशा परिस्थितीतही काही पशुधन विकास अधिकारी चांगली सेवा देत आहे.