नागरिकांची रात्र उघड्यावरच
By Admin | Updated: July 9, 2014 23:26 IST2014-07-09T23:26:48+5:302014-07-09T23:26:48+5:30
पंचायत समितीमार्फत नवबौध्द घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत ब्लँकेट, सतरंज्या, दरी, सौरदिव्याचे वितरण केले जात आहे. या साहित्याचा लाभ घेण्यासाठी तालुका

नागरिकांची रात्र उघड्यावरच
पं.स. प्रशासनाची अनास्था : छल्लेवाडागाववासीयांवर ओढावला प्रसंग
अहेरी : पंचायत समितीमार्फत नवबौध्द घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत ब्लँकेट, सतरंज्या, दरी, सौरदिव्याचे वितरण केले जात आहे. या साहित्याचा लाभ घेण्यासाठी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या छल्लेवाडा येथील नागरिक अहेरी येथे आले होते. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे काम एका दिवसात होऊ शकले नाही. त्यामुळे नागरिकांना रात्र उघड्यावरच काढावी लागली.
छल्लेवाडा येथून नवबौध्द रमाई घरकुल योजनेचे छल्लेवाडा येथील लाभार्थी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली व सौरदिवे व इतर साहित्याचे वितरण करण्याची विनंती केली. परंतु पं.स. तील अधिकाऱ्यांनी थोडा वेळ लागेल. काही कर्मचारी कामात व्यस्त असल्यामुळे प्रतीक्षा करा असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सौरदिव्यांचे वितरण केले. रात्री ९.३० वाजतापर्यंत साहित्याचे वितरण करणे सुरूच होते. त्यामुळे छल्लेवाडा येथे जाण्यासाठी रात्री कुठलेही साधन नव्हते. परिणामी नागरिकांची मोठी पंचाईत झाली. छल्लेवाडाच्या नागरिकांजवळ पुरेसे पैसे नसल्याने त्यांना जेवणाअभावी बिस्कीटांच्या पॉकीटावर रात्री काढावी लागली. काही लोकांनी त्यांची झोपण्याची व्यवस्था एसटी स्टँडच्या शेडमध्ये करू न दिली. परंतु त्याच रात्री पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने अंधारातच संपूर्ण रात्र २५ ते ३० नागरिकांना काढावी लागली. पं.स. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांवर रात्री उघड्यावर राहण्याची वेळ आली. या संदर्भात संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर यांना विचारणा केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौरा असल्याने इतर कर्मचारी माहिती संकलन करीत होते. त्यामुळे सौरदिवे वाटपास उशिर झाला. त्यानंतर ५०० जणांना दिवे वाटप केले अशी माहिती त्यांनी दिली.