सिनेस्टाईल गाड्या चालविणाऱ्या युवकांना नागरिकांचा चोप
By Admin | Updated: April 6, 2017 01:26 IST2017-04-06T01:26:05+5:302017-04-06T01:26:05+5:30
गडचिरोली शहरातून दुचाकी घेऊन जाऊन सायंकाळच्या सुमारास माडेतुकूम ते सालईटोला गावादरम्यान सिनेस्टाईल गाडी चालवून

सिनेस्टाईल गाड्या चालविणाऱ्या युवकांना नागरिकांचा चोप
दहा जणांवर गुन्हे दाखल : माडेतुकूम येथील घटना
गडचिरोली : गडचिरोली शहरातून दुचाकी घेऊन जाऊन सायंकाळच्या सुमारास माडेतुकूम ते सालईटोला गावादरम्यान सिनेस्टाईल गाडी चालवून लोकांना पट्ट्याच्या सहाय्याने मारहाण करणाऱ्या पाच युवकांना माडेतुकूम व सालईटोलाच्या नागरिकांनी जबर चोप दिल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन्ही गावातील दहा नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील एका युवकाला जबर मारहाण झाल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. डेनिस सुधाकर उईके (१६) रा. कुरखेडा, मांतेश वसंतराव कोडापे (१५) रा. साईनगर, गडचिरोली, निंकूज प्रेमेंद्र सहारे (१६) रा. साईनगर, गडचिरोली, दिग्गज प्रकाश लोनबले (१६) रा. रामनगर, गडचिरोली, तारीक अनवर हिदायत खान (१६) रा. स्नेहनगर, गडचिरोली अशी मारहाणीत जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत. डेनिस हा गंभीर जखमी झाल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. हे पाचही युवक मागील १५ दिवसांपासून सालईटोला ते माडेतुकूम दरम्यान सायंकाळच्या सुमारास भरधाव वेगाने दुचाकी चालवित होते. भरधाव वेगामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे सालईटोला व माडेतुकूम येथील नागरिकांनी या युवकांना भरधाव वेगाने दुचाकी न चालविण्याची समज दिली. मात्र ते मानण्यास तयार नव्हते. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांनी मिळून मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पाचही युवकांना चांगलाच चोप दिला.
या प्रकरणाची तक्रार हिदायत खान यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर पोलिसांनी गावकरी पंकज प्रकाश गेडाम, प्रकाश खोब्रागडे, मेहराव भुरले, दिनेश वलादे, महेश भुरले, प्रकाश लटारे, श्रावण मेश्राम, भास्कर मोहुर्ले, धनराज नांदेकर, चंद्रकांत जुआरे या दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील पंकज गेडाम व धनराज नांदेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांचा पीसीआर सुनावला.