Vidhan Sabha Election 2019; गडचिरोलीतील नागरिकांचे म्हणणे, दारु पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 17:20 IST2019-10-01T17:20:26+5:302019-10-01T17:20:52+5:30
विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.

Vidhan Sabha Election 2019; गडचिरोलीतील नागरिकांचे म्हणणे, दारु पिणारा आणि पाजणारा उमेदवार नको
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीतील दारूचा वापर टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या १२० ग्रामपंचायतींमधील २८७ गावांनी ग्रामसभेत ठराव घेतला आहे. त्यात दारू पिणारा आणि पाजणारा उमेदवार देऊ नये, अशी मागणीवजा अपेक्षा राजकीय पक्षांकडे केली आहे.
गडचिरोलीत गेल्या तीन वर्षांपासून राबविल्या जात असलेल्या मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांना दारूचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ६०० गावांनी दारूबंदीचा ठराव घेऊन गावात दारूला थारा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १२० ग्रामपंचायतींनी विधानसभा निवडणूकसुद्धा दारूमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
गावकऱ्यांनी केलेल्या ठरावांमध्ये मुख्यत: तीन मुद्दे मांडले आहेत. त्यात राजकीय पक्षांनी उमेदवार देताना तो दारू पिणारा नसावा, उमेदवारांनी मतांसाठी दारू वाटू नये आणि मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये या मुद्यांचा समावेश आहे. हे ठराव सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हा आणि प्रदेश अध्यक्षांकडे पाठविले असल्याचे डॉ.बंग यांनी सांगितले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी गडचिरोली-चिमूर मतदार संघातील पाचही उमेदवारांनी मतदारांना दारूचे वाटप करणार नाही अशी लेखी हमीच दिली होती. त्याचा बराच परिणामही दिसून आला. यावेळीही जे उमेदवार राहतील त्यांच्याकडून ही हमी घेण्याचा प्रयत्न मुक्तिपथकडून केला जाणार आहे.
जनभावनेचा आदर करावा- डॉ.बंग
ग्रामसभांनी अशा पद्धतीचे ठराव घेऊन निवडणुकीत दारूपासून दूर राहण्याचा निर्णय घेणे हा लोकशाहीचा विजय आहे. केवळ गडचिरोली जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी याचा आदर्श घेतला पाहीजे. तसेच सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी जनभावनेचा आदर करत योग्य उमेदवार निवडणुकीत उतरवावे, असे आवाहन मुक्तिपथ अभियानाचे मार्गदर्शक आणि ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी केले.