काेराेना प्रतिबंधक लस घेण्याकडे नागरिकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:16+5:302021-05-07T04:38:16+5:30
कोरची व तालुक्यात सुरुवातीला ४५ वयोगटावरील लोकांना कोविशिल्ड लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात व कोरची ...

काेराेना प्रतिबंधक लस घेण्याकडे नागरिकांची पाठ
कोरची व तालुक्यात सुरुवातीला ४५ वयोगटावरील लोकांना कोविशिल्ड लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात व कोरची ग्रामीण रुग्णालयात सुरू झाले, परंतु लस लावण्यासाठी आवश्यक प्रतिसाद येथील नागरिकांनी दिला नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील ५०० कोविशिल्ड लस जिल्ह्याला परत पाठविण्यात आले. याबाबत कोरची ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे यांना विचारणा केली असता, लसीकरण करण्यासाठी इंटरनेटची सुविधा व ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणारा ऑपरेटर आवश्यक आहे. परंतु ही सुविधा नव्हती व अफवेमुळे लस घेण्यासाठी नागरिक आले नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा कोरची तालुक्यात ४५ वर्ष वयोगटावरील लाेकांसाठी सुरू झालेल्या लसीकरण माेहिमेचा लाभ घेण्यास नागरिक पुढे येत नाही. काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रकृती खराब होते आणि त्याचा मृत्यू होतो अशा प्रकारची अफवा ग्रामीण भागात असल्याने गैरसमजातून तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नागरिक लसीकरण केंद्रात किंवा शिबिरात जाऊन लस लावून घेण्यास तयार होत नाही कोरची तालुक्यात आतापर्यंत २ हजार ९३८ लस डोस लावण्यात आले आहेत. बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात १ हजार ४३, कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात ५८९, कोरची ग्रामीण रुग्णालयात १ हजार ३०६ लस डाेज लावण्यात जिल्ह्यात एकूण ७५ लसीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये आतापर्यंत एकूण ९५ हजार ४४० डाेज लसीकरण झाले आहे. यामधील ३४ जण बाधित आढळून आले. विशेष म्हणजे, ही लस घेतल्यानंतर कोराेनाची बाधा अत्यल्प कमी प्रमाणात लोकांमध्ये होत असल्याचे गडचिरोली जिल्हा लसीकरण व माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे यांनी सांगितले. ही लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढून संसर्गाचा धोका कमी होतो़ ऑक्सिजन व्हेंटिलेटरची शक्यता फारच कमी असते तसेच मृत्यूचा धोकाही कमी होतो़ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार होत आहे.
बाॅक्स
गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव
कोरोनाने जिल्ह्यासह तालुक्यामध्ये थैमान घातले आहे़ कोरची तालुक्यात आतापर्यंत ८०९ नागरिक बाधित झाले असून ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. मागील काही दिवसातच कोरोनाचा प्रकोप कोरची तालुक्यामध्ये झपाट्याने वाढला असून शहरासह ग्रामीण भागातील बेडगाव, कोटगूल, सोनपूर, बेलगाव घाट, मसेली, बोटेकसा आदी गावांमध्ये सातत्याने कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे़ अन्यथा संपूर्ण कोरची तालुका काही दिवसात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे़
कोट
सोशल मीडियावर काही समाजकंटकांकडून अफवा पसरवण्यात येत आहे, की कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने लोक मृत्युमुखी पडतात. तसेच अशक्तपणा येतो, असा गैरसमज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे लोक लस घेण्यास नकार देत आहेत. कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन ही सुरक्षित लस आहे. लस घेतल्यानंतर एक दोन दिवस ताप येणे,अंग दुखणे, मळमळ होणे यासारखी साैम्य लक्षणे दिसून शकतात. ह्या लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढून त्यावर मात करता येते. दोन डाेस झाल्यानंतर ३० ते ४० दिवसांनंतर प्रतिकारशक्ती वाढते. ही लस घेतल्यानंतर मृत्यूचा धाेका अत्यल्प असताे. कुठलाही अशक्तपणा येत नाही किंवा विपरित परिणाम हाेत नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोफत लस घ्यावी आणि स्वतःसह परिवाराला सुरक्षित ठेवावे.
डॉ. विनोद मडावी, तालुका आरोग्य अधिकारी कोरची