गाेठणगावातल्या गाेशाळेतील असुविधेने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:25 IST2021-07-21T04:25:06+5:302021-07-21T04:25:06+5:30
कुरखेडा : गोठणगाव नाक्यावर असलेल्या गोशाळेतील जनावरांची योग्य पद्धतीने देखभाल न करता जनावरांना वाऱ्यावर सोडले जात आहे. गोशाळा संचालक ...

गाेठणगावातल्या गाेशाळेतील असुविधेने नागरिक त्रस्त
कुरखेडा : गोठणगाव नाक्यावर असलेल्या गोशाळेतील जनावरांची योग्य पद्धतीने देखभाल न करता जनावरांना वाऱ्यावर सोडले जात आहे. गोशाळा संचालक गोशाळेच्या नावावर मलाई खात असून, जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जनावरांना मोकाट सोडून इतर शेतमालकांचे नुकसान करीत आहे. मृत जनावरांनाही उघड्यावर टाकले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आहे. या प्रकाराबद्दल गोशाळेच्या संचालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आज गोशाळा संचालक व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. मोकाट जनावरांमुळे शेतकरी बांधवांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. मृत जनावरांची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने गोठणगाव येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच संतोष हिळामी, उपसरपंच रामजी लांजेवार, संतोष बारई, अमोल दोनाडकर, युधिष्ठीर राऊत, श्रीहरी राऊत यांनी केली आहे.
गोठणगाव हद्दीत गणपती गोशाळा ही चालविण्यात येते. गोशाळेत कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन गोशाळेत डांबले जाते. गोशाळेतील जनावरांना पशुखाद्य व चारा-पाण्याची सोय वैद्यकीय सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी संचालकांची असताना येथे जनावरांचे हाल होत आहेत व जनावरे दगावत आहेत.
(बॉक्स)
दुर्गंधीमुळे सर्वच जण त्रस्त
दगावलेल्या जनावरांचे पशुचिकित्सा विभागामार्फत शवविच्छेदन करण्यात येत नाही व त्यांना उघड्यावर फेकण्यात येते. त्यामुळे या नाक्यावर सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. या नाक्यावर हाॅटेल, पानटपऱ्या, चिकन शाॅप, भोजनालय असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या परिसरात शेकडो हेक्टर शेतजमीन आहे. येथील जनावरे मोकाट फिरत असल्याने शेतीचेसुद्धा मोठे नुकसान होत आहे.
200721\img20210719141612.jpg
गोठणगाव नाक्यावर असलेली गोशाळा