जळाऊ लाकूड खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
By Admin | Updated: April 12, 2015 02:14 IST2015-04-12T02:14:56+5:302015-04-12T02:14:56+5:30
सध्या लग्नसमारंभाचे दिवस असल्याने जळाऊ लाकूड खरेदी करण्याकरिता येथील पोटेगाव मार्गावरील वन विभागाच्या आगारात नागरिकांची गर्दी होत आहे.

जळाऊ लाकूड खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
गडचिरोली : सध्या लग्नसमारंभाचे दिवस असल्याने जळाऊ लाकूड खरेदी करण्याकरिता येथील पोटेगाव मार्गावरील वन विभागाच्या आगारात नागरिकांची गर्दी होत आहे. सदर लाकडे आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी मिळत असल्याने अनेकांना रांगेत उभे राहून लाकडांची खरेदी करावी लागते. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हात दीर्घकाळ उभे राहणे ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना शक्य होत नाही. शिवाय लाकडे खरेदी करण्याकरिता वन विभागाने रेशनकार्ड सक्तीचे केल्याने ज्यांच्याकडे कार्ड उपलब्ध नाही, अशांना कसरत करावी लागते. एका रेशनकार्डवर केवळ दोन मण लाकडे मिळत असल्याने त्यासाठी नागरिक दिवसभर आगारात ठाण मांडून असतात. शिवाय अनेक वनाधिकारी नागरिकांनी आधारकार्डचीही मागणी करतात. त्यामुळे वन विभागाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आहे. शिवाय जंगलामध्ये जळाऊ लाकडांचीही कमतरता नाही. परंतु जंगलातून वाळलेली लाकडे आणताना वनाधिकारी पकडतात. त्यामुळे अनेकजण आगारातून लाकडे खरेदी करणे योग्य मानतात.
शहर परिसरातील गावांमध्ये क्वचितच लोकांकडे सिलिंडर आहे. अनेकजण केरोसीनवर स्वयंपाक करतात. मात्र सर्वसामान्य लोकांना सिलिंडर अथवा वेळीच उपलब्ध होत नसल्याने केरोसीनचा वापर परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकजण आगारातून लाकडांची खरेदी करतात. सध्या लग्नसमारंभाचे दिवस असल्याने अनेक गावांमधील नागरिक वाळलेली लाकडे खरेदी करण्याकरिता वन आगारात जात आहेत. मात्र वनाधिकाऱ्यांकडून मागितल्या जाणाऱ्या विविध कागदपत्रांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वन विभागाने आठवड्यातून दोन ते तीन दिवस लाकडांची विक्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)