सिलिंडरच्या तुटवड्याने शहरातील नागरिक हैराण
By Admin | Updated: October 20, 2014 23:12 IST2014-10-20T23:12:54+5:302014-10-20T23:12:54+5:30
शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ

सिलिंडरच्या तुटवड्याने शहरातील नागरिक हैराण
ंगडचिरोली : शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ ५० सिलिंडर देण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असल्याने अनेक नागरिकांना गॅस सिलिंडरपासून वंचित राहावे लागत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.
शहरात गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. परिणामी नागरिकांना रॉकेल, सरपणावर स्वयंपाक करावा लागत आहे. जिल्हा वनाने संपन्न असल्याने मोठ्या प्रमाणात सरपणाची व्यवस्था जंगलातून होऊ शकते, परंतु सरकारने पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा ध्यास घेतल्यामुळे धूरविरहीत इंधनाचा वापर करणे नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी भरपूर प्रमाणात सरपणाचा वापर केला जातो. परंतु गडचिरोली शहरात सरपणाचा वापर करणे नागरिकांना शक्य नाही. शहरात हजारो कुटुंबियांकडे गॅस सिलिंडर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम शहरातील नागरिक करत आहेत. परंतु गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शहरातील नागरिकांची वाताहत होत आहे. संबंधीत एजन्सीकडून दर दिवशी ५० सिलिंडर देण्याचे प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच अनेक नागरिक एजन्सीसमोर रांगा लावून उभे राहत असल्याचे अनेक दिवसांपासूनचे चित्र आहे.
रात्रीपासूनच सिलिंडरसाठी नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. गॅस एजन्सी सकाळी ९ ते १० वाजता सुरू होत असल्याने नागरिकांना सिलिंडर दुपारपर्यंत मिळतो. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना रांगेत उभे राहूनही परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्याबरोबरच त्रासही सहन करावा लागत आहे. नगर परिषदेचे सभापती संजय मेश्राम व अजय भांडेकर यांनी पुरवठा अधिकाऱ्यांची विचारणा केली असता, कम्प्युटर सॉफ्टवेअरमधून केवळ ५० पावत्यांचे नियोजन असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले. दररोज नागरिकांना गॅस एजन्सीसमोर ताटकळत उभे राहून सिलिंडरची मागणी करावी लागत आहे. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना सकाळपासून रांगेत राहूनही शेवट परत जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्य:स्थितीत दिवाळी सण जवळ येऊन ठेपल्याने शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडरचा वाढीव पुरवठा करावा, अशी मागणी न. प. चे सभापती संजय मेश्राम, अजय भांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)