पोलिसांच्या श्रमदानातून चिन्नावट्रा रस्त्याची दुरूस्ती
By Admin | Updated: October 17, 2016 02:07 IST2016-10-17T02:07:28+5:302016-10-17T02:07:28+5:30
अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत व्यंकटापूर-चिन्नावट्रा या अहेरीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती.

पोलिसांच्या श्रमदानातून चिन्नावट्रा रस्त्याची दुरूस्ती
प्रेरणादायी उपक्रम : ग्रामस्थांनीही केले सहकार्य
आलापल्ली : अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत व्यंकटापूर-चिन्नावट्रा या अहेरीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. तक्रार करूनही संबंधित प्रशासनाने या रस्त्याची दुरूस्ती केली नाही. अखेर पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून शुक्रवारी श्रमदान करून सदर रस्त्याची पक्की दुरूस्ती केली.
व्यंकटापूर-चिन्नावट्रा-पेदावट्रा या कच्च्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. खडीकरण पूर्णत: उखडले होते. त्यामुळे राज्य परिहवन महामंडळाच्या बस वाहतुकीसह खासगी प्रवासी वाहतूकही प्रचंड प्रभावित होत होती. परिणामी व्यंकटापूर, चिन्नावट्रा येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. पक्क्या रस्त्याअभावी वाहतूक व्यवस्था प्रभावित झाल्याने या भागातील काही व्यक्तींना वेळेवर औषधोपचार मिळाला नाही. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच मागील काही दिवसात औषधोपचाराअभावी लहान मुले दगावल्याच्या अनेक घटनाही व्यंकटापूर भागात घडल्या. रस्त्याअभावी वाहतुकीची साधनेही या भागात उपलब्ध होत नव्हती. परिणामी नागरिकांना पायी प्रवास करावा लागत होता.
या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनात व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, अधिकारी व चिन्नावट्रा व व्यंकटापूरच्या नागरिकांनी श्रमदानातून या रस्त्याची पक्की दुरूस्ती केली. याकरिता व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, अनिकेत हिवरकर, शहाजी गोसावी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)