भाव पडल्याने मिरची उत्पादक चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST2021-03-04T05:09:03+5:302021-03-04T05:09:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : नागपुरात वाढत असलेल्या रुग्णांमुळे व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मिरचीचे ...

भाव पडल्याने मिरची उत्पादक चिंतित
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : नागपुरात वाढत असलेल्या रुग्णांमुळे व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मिरचीचे भाव पडण्यास सुरुवात झाली आहे. १५ हजार रुपये प्रति क्विंटल असलेला भाव आता ११ हजार रुपये प्रति क्विंटल झाला आहे. मिरची निघण्यास सुरुवात झाली असतानाच मिरचीचे भाव पडत असल्यामुळे शेतकरी चिंतित आहे.
सिराेंचा तालुक्यातील गाेदावरीच्या काठी माेठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली जाते. सिराेंचा तालुका मिरची उत्पादनात गडचिराेली जिल्ह्यात अग्रेसर असलेला तालुका आहे. तेलंगणा राज्यात माेठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली जाते. सिराेंचा तालुका तेलंगणा राज्याला लागून आहे. त्यामुळे मिरची लागवडीचे तंत्र येथील शेतकऱ्यांना माहीत आहे. शेकडाे हेक्टरवर मिरची पिकाची लागवड केली जाते. या माध्यमातून हजाराे नागरिकांना राेजगार उपलब्ध हाेतो.
सिराेंचातील मिरचीचा दर्जा अतिशय चांगला असल्याने तेलंगणा व नागपूर येथील बाजारपेठेत या मिरचीला चांगला भाव मिळते. मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे मिरची विक्रीत अडचणी येत हाेत्या. काही शेतकऱ्यांना त्यांची मिरची पावसाळ्यादरम्यान विकावी लागली. या वर्षी सध्या मिरची ताेडण्याचा हंगाम सुरू झाला आहे. काही शेतकरी मिरची ताेडल्याबराेबर विक्रीस काढतात. तेलंगणा राज्यातील बाजारपेठेच्या तुलनेत नागपुरातील बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकरी नागपूरच्या बाजारपेठेत मिरची विक्रीसाठी आणतात. १ महिन्यापूर्वी बाजारपेठेत मिरचीचा भाव १५ हजार रुपये क्विंटलपर्यंत पाेहाेचला हाेता. मागील आठ दिवसांपासून नागपुरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्यापारी बाजारपेठेत येत नसल्याने भाव पडण्यास सुरुवात झाली आहे. आता ११ हजार रुपये क्विंटल रुपये प्रमाणे मिरची खरेदी केली जात आहे. क्विंटलमागे चार हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
बाॅक्स
लाॅकडाऊनच्या भीतीने मजुरांचा काढता पाय
सिराेंचा तालुका व तेलंगणा राज्यात चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा या जिल्ह्यांमधील मजूर मिरची ताेडण्यासाठी जातात. विदर्भात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने लाॅकडाऊन केले जाईल, असा गैरसमज मजुरांमध्ये निर्माण झाला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातच शासनाने लाॅकडाऊन केले हाेते. परतीच्या प्रवासात माेठ्या हालअपेष्टा मजुरांना सहन कराव्या लागल्या हाेत्या. या वर्षीही लाॅकडाऊन झाल्यास त्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागतील, असा गैरसमज निर्माण झाला असल्याने काही मजूर मिरची ताेडणी अर्धवट साेडून गावाकडे परतत असल्याचे दिसून येत आहे. मजूर परतल्याने शेतकरी चिंतित आहेत.