पुजाऱ्याकडे उपचार केल्याने बालिकेचा मृत्यू
By Admin | Updated: March 3, 2017 01:03 IST2017-03-03T01:03:32+5:302017-03-03T01:03:32+5:30
तालुक्यातील तुमरगुंडा येथे दोन दिवस पुजाऱ्याकडे उपचार केल्यानंतर एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ

पुजाऱ्याकडे उपचार केल्याने बालिकेचा मृत्यू
एटापल्ली : तालुक्यातील तुमरगुंडा येथे दोन दिवस पुजाऱ्याकडे उपचार केल्यानंतर एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दीड महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली.
साक्षी सदू तलांडे असे मृतक बालिकेचे नाव असून ती मागील दोन दिवसांपासून न्युमोनिया आजाराने ग्रस्त होती. परंतु कुटुंबातील लोकांनी तिला उपचारासाठी डॉक्टरकडे न नेता गावठी पुजाऱ्याकडे नेले व गावीच उपचार सुरू केला. परंतु गुरूवारी तिची प्रकृती अधिक गंभीर होताच बालिकेला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु दाखल केल्यानंतरही बालिका उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. तेव्हा डॉक्टरांनी बालिकेला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यास कुटुंबियांना सांगितले. परंतु उपचारादरम्यानच दुपारी १ वाजता तिचा मृत्यू झाला. न्युमोनिया आजारामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एटापल्ली तालुक्यात गावठी पुजाऱ्यांकडे उपचार करताना अनेक रूग्ण दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत.