मेळघाटात बालमृत्यूचे थैमान
By Admin | Updated: February 28, 2015 05:10 IST2015-02-28T05:10:10+5:302015-02-28T05:10:10+5:30
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांत गेल्या १० महिन्यांत तब्बल ३०७ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक बाब

मेळघाटात बालमृत्यूचे थैमान
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांत गेल्या १० महिन्यांत तब्बल ३०७ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खोज या संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आणली आहे. एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यान ६ वर्षांखालील मृत पावलेल्या बालकांची ही संख्या आहे.
संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत ५५४ बालमृत्यू झाले आहेत. त्यात १२ गैरआदिवासी तालुक्यांत एकूण २४७ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर मेळघाटातील केवळ दोन आदिवासी तालुक्यांत तब्बल ३०७ बालमृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. बालमृत्यूच्या एवढ्या भीषण परिस्थितीनंतरही मेळघाटाबाबत प्रशासन मात्र उदासीन असल्याचा आरोप संस्थेचे अॅड. बी एस साने यांनी गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
परिषदेत साने म्हणाले की, मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडे कोणतेही ठोस धोरण नाही. दरवर्षी आरोग्य मंत्री, आदिवासी मंत्री, प्रधान सचिव असे बडे नेते आणि अधिकारी मेळघाटाचा दौरा करतात. मात्र आदिवासींसाठी कोणतेही ठोस धोरण राबवले जात नाही. गेल्या १८ वर्षांत मेळघाटात १० हजार १६९ बालमृत्यू झाले आहेत. यावरून शासनाची मेळघाटाप्रती असलेली संवेदनशीलता स्पष्ट होते. (प्रतिनिधी)