मुख्य वनसंरक्षकाची एसबीमार्फत चौकशी होणार

By Admin | Updated: July 22, 2015 02:29 IST2015-07-22T02:29:30+5:302015-07-22T02:29:30+5:30

गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांची बदली पावसाळी अधिवेशन संपण्याआधी करण्यात येईल.

Chief Vigilant SBI will conduct inquiry | मुख्य वनसंरक्षकाची एसबीमार्फत चौकशी होणार

मुख्य वनसंरक्षकाची एसबीमार्फत चौकशी होणार

वनमंत्र्यांचे आश्वासन : विजय वडेट्टीवारांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीची केली होती मागणी
गडचिरोली : गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांची बदली पावसाळी अधिवेशन संपण्याआधी करण्यात येईल. तसेच त्यांच्याविषयीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिल्यास सखोल चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे एसीबीमार्फतही चौकशी करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या उत्तरात दिले.
टी. एस. के. रेड्डी यांनी मागील चार वर्षात रोजगार हमी योजना व बांबू तोड आणि खरेदी विक्री व्यवहारात केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर वनमंत्री उत्तर देत होते. या संदर्भात विधानसभेत आमदार वडेट्टीवार म्हणाले की, मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनी गेल्या चार वर्षात १०० कोटीच्या वर भ्रष्टाचार केला असून याबाबत पुरावे पाहिजे असल्यास मी द्यायला तयार आहे. रेड्डी यांनी नियम व अटीला डावलून कुनघाडा परिक्षेत्र कक्ष क्रमांक ५१, ५२, ६७, पोटेगाव परिक्षेत्र कक्ष क्रमांक ७३, ७४, ७८, ८८, धानोरा परिक्षेत्र कक्ष क्रमांक ४९९, ५००, ५०१, ५२४ हे या तिन्ही क्षेत्रातील कूप सन २०१२-१३ मध्ये बांबू तोडीस उपलब्ध नसताना अ वर्गात येणारे हे तिन्ही कूप तोडीस पात्र ठरवून अवैधरित्या बांबूतोड केली. खोब्रामेंढा गावास कक्ष क्रमांक ४१६ ची सन २०१२ व सन २०१४ मध्ये बांबू कटाई मुख्य वनसंरक्षक यांनी अवैधपणे परवानगी दिल्यामुळे १ हजार ७०० बांबूची कटाई करण्यात आली. खोब्रामेंढा गावातील परिक्षेत्र क्रमांक ४१६ मध्ये जंगलच नसताना अवैधपणे नियमबाह्य बांबू तोडीस परवानगी देण्यात आली. बेडगाव, मालेवाडा, पुराडा या तीन क्षेत्रामध्ये चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत ४० कोटींची कामे करण्यात आली. बोगस मजुरांची हजेरी पटावर नावे दाखवून त्यांच्या नावे लाखो रूपयांचे वेतन काढून गैरप्रकार केले. या तीन क्षेत्रात चार वर्षांत २५० पेक्षा जास्त बंधारे बांधण्यात आली. त्यापैकी २१२ बंधाऱ्यांचे बांधकाम अर्धवट असून ते पूर्ण झाल्याचे दाखवून गैरप्रकार केला आहे. मजुरांच्या मार्फतीने जमा केलेल्या दगड कंत्राटदाराच्या माध्यमातून दाखवून बोगस बिलाद्वारे खरेदी केल्याचेही दाखविण्यात आले आहे, असे सभागृहात आमदार वडेट्टीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Vigilant SBI will conduct inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.