चोख बंदोबस्तामुळेच मुख्यमंत्री होते बिनधास्त
By Admin | Updated: May 14, 2017 01:38 IST2017-05-14T01:38:52+5:302017-05-14T01:38:52+5:30
राज्याच्या मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीचा अतिसंवेदशिल अशा नक्षलग्रस्त भागातील दौरा

चोख बंदोबस्तामुळेच मुख्यमंत्री होते बिनधास्त
अतिसंवेदनशिल भाग : दौरा झाला निर्विघ्नपणे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीचा अतिसंवेदशिल अशा नक्षलग्रस्त भागातील दौरा आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरील तीन कार्यक्रम यामुळे शुक्रवारचा दिवस पोलीस विभागासाठी अतिशय तणावाचा होता. मात्र हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडाचा अपवाद वगळता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा निर्विघ्नपणे, कुठल्याही हिंसक घटनेशिवाय पार पडल्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त आणि योग्य नियोजनामुळेच हे शक्य झाल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले की, बामनपेठ हे ठिकाण अतिसंवेदनशिल असल्याने त्या परिसरात दोन दिवसांपूर्वीपासून पोलीस विभागाचा बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: कार्यक्रमाच्या एक दिवसाअगोदर त्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) डॉ.महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) नवनाथ ढवळे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या नेतृत्वात तिथे पोलिसांचा बंदोबस्त होता. कार्यक्रमाच्या वेळीही हे अधिकारी स्वत: तिथे उपस्थित होते, असे डॉ.देशमुख यांनी कळविले.