बुद्धिबळ खेळाने एकाग्रता वाढते
By Admin | Updated: March 6, 2017 00:40 IST2017-03-06T00:40:32+5:302017-03-06T00:40:32+5:30
बुद्धिबळ खेळात सतत डोके लावावे लागते.त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता व आत्मविश्वास वाढण्यास फार मोठी मदत होते.

बुद्धिबळ खेळाने एकाग्रता वाढते
नगराध्यक्षांचे प्रतिपादन : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बुद्धिबळ स्पर्धा
गडचिरोली : बुद्धिबळ खेळात सतत डोके लावावे लागते.त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता व आत्मविश्वास वाढण्यास फार मोठी मदत होते. त्यामुळे असे खेळ आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
गडचिरोली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंकरिता बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष सतीश आयलवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ. प्रशांत चलाख, गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, अमित सूचक, सचिव हेमप्रकाश बारसागडे, कोषाध्यक्ष किरण सांबरे, सदस्य तानाजी भुरसे, गिरीष नरड, अरूण पत्रे, चंद्रशेखर तोटावार आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे २०० स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद पिपरे म्हणाले की, गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन ही महाराष्ट्र चेस अॅन्ड हॉक कमिटीला संलग्न असल्यामुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना राज्यस्तरीय व अखिल भारतीय बुध्दीबळ स्पर्धामध्ये भाग घेण्यास वाव मिळणार आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा यापुढेही आयोजित केल्या जातील, असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकातून असोसिएशनचे अध्यक्ष सतिश आयलवार म्हणाले की, बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाणार आहे. तालुकास्तरावर सुध्दा स्पर्धा आयोजित करून जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाणार आहे, असे मार्गदर्शन केले. संचालन व आभार आर. वाय. सोरते यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)