ताडीमध्ये रासायनिक द्रव्यांची भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST2021-04-23T04:39:01+5:302021-04-23T04:39:01+5:30

एटापल्ली : एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा तालुक्यात ताडी प्रसिध्द आहे. मात्र काही नागरिक ताडीमध्ये रासायनिक द्रव्य मिसळून त्याची विक्री ...

Chemical adulteration in toddy | ताडीमध्ये रासायनिक द्रव्यांची भेसळ

ताडीमध्ये रासायनिक द्रव्यांची भेसळ

एटापल्ली : एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा तालुक्यात ताडी प्रसिध्द आहे. मात्र काही नागरिक ताडीमध्ये रासायनिक द्रव्य मिसळून त्याची विक्री करीत असल्याचे प्रकार वाढत चालले आहेत.

शाैचालयाचा वापर नाही

आलापल्ली : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे; मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालय बेकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.

अनेक भूखंड रिकामे

गडचिरोली : शहराजवळची शेकडो एकर जागा एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही राज्य शासनाच्यावतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. काही भूखंडांवर उद्योग स्थापन झाले नाही.

दत्तमंदिराचा विकास करा

आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे दत्ताचे मंदिर आहे. भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मंदिराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी होत आहे. स्थानिक लाेकांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने सहकार्य करावे.

कनेक्टिव्हिटीअभावी ग्राहक त्रस्त

अहेरी : दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा पोहोचली नाही. त्यामुळे बँकांनी व्ही-सॅट यंत्रणा खरेदी करून कनेक्टिव्हिटी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही यंत्रणा व्यवस्थित नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत.

आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम थंडावले

गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता. मात्र आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे. शासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.

योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.

गडचिरोली-पेंढरी मार्गावर बसफेऱ्या अत्यल्प

धानोरा : गडचिरोली आगारातून पेंढरी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोलीवरून एटापल्ली-अहेरीकडे जाण्यासाठी गडचिरोली-कारवाफा-पेंढरी हा प्रमुख मार्ग आहे.

गरोदर मातांना बुडीत मजुरी देण्याची मागणी

सिरोंचा : गरोदर मातांना शासनाकडून बुडीत मजुरी दिली जाते. मात्र जिल्ह्यातील मातांना ही मजुरी देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. महिला रुग्णालयात चकरा मारत आहेत. ही मजुरी तत्काळ देण्याची मागणी होत आहे. काही महिलांना एक ते दीड वर्षापासून बुडीत मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला अद्यापही वंचित आहेत.

शहरातील अनेक वॉर्डात सट्टापट्टी जोमात

गडचिरोली : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र याकडे गडचिरोली पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. आयपीएलवरही मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे.

घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला

गडचिरोली : गेल्या दोन वर्षापासून सळी, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्यांचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.

पशु योजनांबाबत जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.

मूल मार्गावरील बसफेऱ्या वाढवा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आता अनलाॅक झाल्यापासून विवाह साेहळे सुरू झाले आहेत. परिणामी प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेऱ्यांची गरज आहे.

अर्धवट पुलावरून खडतर प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.

कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज

गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

कमलापूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा कुचकामी

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात शासनातर्फे भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून रेपनपल्ली येथे बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचा मनोरा उभारण्यात आला. मात्र सदर टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. परिणामी जनता त्रस्त झाली आहे.

तंटे मिटविण्यात समित्या अपयशी

धानोरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण-तंटे वाढत आहेत. मात्र समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या प्रेमीयुगुलांचे विवाह लावून देण्यात पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.

मार्गाच्या बाजूला वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर कारवाई करावी.

दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरू

धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जळाऊ कोळशाचे भाव कडाडले

आष्टी : बहुतांश नागरिक आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी कोळशाच्या शेगडीचा वापर करीत आहेत. या शेगडीने अत्यंत कमी खर्चात पाणी गरम होते. त्यामुळे शेगडी पेटविण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो.

राजपूर व बोरीतील डुकरांचा बंदोबस्त करा

अहेरी : राजपूर पॅच व बोरी परिसरात मोकाट डुकरांचा त्रास वाढला आहे. या भागातील नागरिक डुकरांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले असल्याने त्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डुकरांच्या हैदोसामुळे लहान मुलेही भयभीत झाली आहेत.

बालकांची आरोग्य तपासणी थंडबस्त्यात

गडचिरोली : अंगणवाडीतील बालके व शाळांमधील विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्वतंत्र बालस्वास्थ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र भामरागडसह अनेक तालुक्यांतील पथकात डॉक्टरच उपलब्ध नाहीत. त्यामुळे बालकांची आरोग्य तपासणी रखडली आहे. पथकात डॉक्टरसह इतरही कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

भरधाव वाहनांवर कारवाई करा

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

केरोसीनअभावी ग्रामीण भागात अडचण

गडचिरोली : ज्या नागरिकांकडे सिलिंडर उपलब्ध आहे, अशा नागरिकांना केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने दिवा कसा लावावा, असा प्रश्न आहे. गॅस मिळाला असला, तरी थंडीच्या दिवसात अनेकजण चुलीवर पाणी गरम करतात.

Web Title: Chemical adulteration in toddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.