‘त्या’ ११ मुलींचे आरोप पूर्णत: निराधार

By Admin | Updated: February 20, 2017 00:43 IST2017-02-20T00:43:29+5:302017-02-20T00:43:29+5:30

चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमधील त्या ११ मुलींनी पोलिसात दिलेली तक्रार पूर्णत: खोटी आहे. तसेच पत्रकार परिषदेत माझ्यावर व संस्थेवर केलेले सर्व आरोप निराधार आहेत.

The charges of the 11 girls are totally baseless | ‘त्या’ ११ मुलींचे आरोप पूर्णत: निराधार

‘त्या’ ११ मुलींचे आरोप पूर्णत: निराधार

संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न : प्रमोद साळवे व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींची पत्रपरिषदेत माहिती
गडचिरोली : चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमधील त्या ११ मुलींनी पोलिसात दिलेली तक्रार पूर्णत: खोटी आहे. तसेच पत्रकार परिषदेत माझ्यावर व संस्थेवर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. सदर ११ मुलींनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रात्री-बेरात्री रॅगिंग घेतली, अशी तक्रार स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चातगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र या तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली नाही. या प्रकरणी कारवाई होऊ नये, याकरिता त्या ११ मुलींनी माझ्यावर निराधार आरोप केले, अशी माहिती डॉ. प्रमोद साळवे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सुषमा गजभिये व विद्यार्थिनींनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष नीलिमा बारसागडे, सचिव भारती सडमेक, अभिलाषा तागडे, नगिना कन्नाके, पूजा सडमेक, प्राजक्ता भांडेकर आदींसह विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
यावेळी सर्वांनी सांगितले की, बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थिनी नलिनी पुडो, गुणश्री बेताल, श्वेता घुमे, राजश्री गावंडे, मोनाली गडपाडे, हीना शेख, शीतल गेडाम, दीपिका हरामी, उत्कर्षा मसराम, स्वाती जांभुळकर व प्रज्ञा चुनारकर आदी ११ मुली १३ फेब्रुवारी २०१७ रोजी वसतिगृह व कॉलेजमधून बेपत्ता होत्या. दुपारी ३ वाजता कुठलीही परवानगी न घेता व न सांगता वसतिगृहाच्या बाहेर गेल्या, अशी माहिती नर्सिंगच्या कॉलेजच्या प्राचार्य सुषमा गजभिये यांना मिळाली व तशी तक्रार गजभिये यांनी चातगाव पोलीस मदत केंद्रात त्याच दिवशी दाखल केली.
त्यानंतर या सर्व विद्यार्थिनींच्या पालकांना प्राचार्य सुषमा गजभिये व शिक्षिका प्रेरणा रासेकर यांनी फोनद्वारे सदर मुली वसतिगृहातून बेपत्ता असल्याची माहिती दिली, असे त्यांनी सांगितले.
नर्सिंग कॉलेजमधील तब्बल १३४ मुलींची या ११ मुलींच्या विरोधात माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे, अशी माहिती डॉ. साळवे यांनी यावेळी दिली. सदर ११ मुली प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रात्रीच्या वेळी रॅगिंग घेतात. तसेच रात्री अभ्यास करीत नाही, इकडे तिकडे भटकत असतात, असे विद्यार्थिनींनी सांगितले. पालक सभेत गोंधळ घालणाऱ्या सदर ११ मुलींवर व त्यांनी सोबत आणलेल्या हंसराज बेताल, नागपूरचा पोलीस शिपाई गणेश, हमीद शेख तसेच अन्य एका इसमावर कारवाई करावी, अन्यथा आपण व अन्य विद्यार्थिनी तीव्र आंदोलन उभारतील, असा इशाराही डॉ. प्रमोद साळवे यांनी केला. (प्रतिनिधी)

संस्थाध्यक्षांच्या कारभारामुळे आमचे शैक्षणिक नुकसान
प्रवेश शुल्क न दिल्याचे कारण सांगून संस्थापंकांनी आमचा महाविद्यालयात प्रवेश करुन घेतला नाही. त्यामुळे आम्हाला परीक्षेत नापास करण्यात आले, तसेच साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांच्याकडून आम्हाला अभद्र वागणूक मिळते, असा आरोप चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजच्या बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला राजश्री गावंडे, शीतल गेडाम, हीना शेख, गुणश्री बेताल, श्वेता घुमे, दीपिका हारामी, उत्कर्षा मसराम, प्रज्ञा चुनारकर, नलिनी पुडो व त्यांचे पालक उपस्थित होते. या सर्वांनी सांगितले की, आम्ही चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये बीएस्सी नर्सिंगच्या द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत आहोत. विद्यार्थिंनींनी त्यांच्या जातनिहाय प्रवर्गानुसार आकारण्यात आलेले शुल्क देऊन महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्या शुल्काशिवाय खानावळ व बसशुल्कही आम्ही वेळोवेळी देत असतो. परंतु यंदा परीक्षा दिल्यानंतर ६ विद्यार्थिनींना शून्य गूण देण्यात आले, तर अन्य ६ विद्यार्थिनींचे निकाल प्रतीक्षेत ठेवण्यात आले. यासंदर्भात आपण नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘हा विषय तुमच्या महाविद्यालयाशी संबंधित असून, त्यांच्याशीच संपर्क साधा,’ असे उत्तर दिले. यावरुन संबंधित महाविद्यालयाचे संस्थापक आमच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असल्याचे दिसून येते, असे विद्यार्थिनींनी सांगितले. डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये अनेक भौतिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थिनी त्रस्त आहोत, असेही विद्यार्थिनींनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: The charges of the 11 girls are totally baseless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.