न.पं.चा कारभार ढेपाळला
By Admin | Updated: July 6, 2017 01:42 IST2017-07-06T01:42:52+5:302017-07-06T01:42:52+5:30
शासनाने तालुका ठिकाणच्या शहरातील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा दिला. मात्र नगर पंचायतीत नव्याने कर्मचाऱ्यांची पदभरती केली नाही.

न.पं.चा कारभार ढेपाळला
आरमोरीकर त्रस्त : मुख्याधिकाऱ्यांसह सात कर्मचाऱ्यांवर भिस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शासनाने तालुका ठिकाणच्या शहरातील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा दिला. मात्र नगर पंचायतीत नव्याने कर्मचाऱ्यांची पदभरती केली नाही. आरमोरी नगर पंचायतीत सध्या एक मुख्याधिकारी व सात कर्मचारी कार्यरत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आरमोरी नगर पंचायतीचा प्रशासकीय कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. परिणामी विविध समस्यांनी आरमोरीकर प्रचंड त्रस्त आहेत.
५ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार, आरमोरी नगर पंचायतीत एकूण २९ पदे मंजूर आहेत. यामध्ये सहायक कार्यालय अधीक्षक १, सहायक मालमत्ता पर्यवेक्षक १, माहिती व जनसंपर्क अधिकारी १, कर निरिक्षक १, लेखापाल १, लेखा परिक्षक १, स्थापत्य अभियंता १, पाणी पुरवठा अभियंता १, नगर रचनाकार १ तसेच लिपीक टंकलेखक ७, स्वच्छता निरिक्षक २, प्रयोगशाळा सहायक १, वीजतंत्र जोडारी ३, वायरमन १, शिपाई ३, मुकादम २, वाल्वमन १ आदींचा समावेश आहे. आरमोरी नगर पंचायत स्थापन होऊन दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या काळापेक्षा आता नगर पंचायतीच्या काळात आरमोरी शहराची लोकसंख्या वाढली आहे. सद्य:स्थितीत आरमोरी शहराची लोकसंख्या २७ हजाराच्या आसपास आहे. लोकांची वस्ती वाढल्यामुळे समस्यांमध्येही वाढ झाली आहे.
आरमोरी शहरातील विविध वार्डात रस्ते, नाल्यांची समस्या आहे. बहुतांश ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी या समस्या मार्गी लावण्यात नगर पंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. नगर पंचायतीत पदभरतीची प्रक्रिया न झाल्याने विकासाचे नियोजन करण्यास अडचण निर्माण झाली आहे. येथे अनुभवी अधिकारी नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही पडत आहे. ग्रामपंचायतीच्या काळातीलच जुने कर्मचारी कार्यरत आहेत. येथे सहा पुरूष व दोन महिला कर्मचारी नगर पंचायतीचा कामकाज चालवित आहे. आरमोरी शहराच्या विकासासाठी शासनाने येथे पदभरती प्रक्रियेस मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी आरमोरीवासीयांनी केली आहे.
आरमोरी नगर पंचायतीत सध्या मुख्याधिकारी म्हणून सतीश चौधरी हे काम पाहत आहे. मात्र येथे विभागनिहाय अभियंते, लेखापाल, लिपीक नसल्याने कामाची गती माघारली असून विकास प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आह.े