चारभट्टीचा पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर
By Admin | Updated: April 1, 2015 01:38 IST2015-04-01T01:38:30+5:302015-04-01T01:38:30+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू असलेले कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर चारभट्टी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत.

चारभट्टीचा पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर
पलसगड : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू असलेले कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर चारभट्टी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याची सेवा पूर्णत: कोलमडली आहे. परिणामी या भागातील पशुपालकांमध्ये प्रशानाच्याप्रती रोष व्यक्त होत आहे.
चारभट्टी हे गाव ३०० घरांच्या लोकवस्तीचे गाव आहे. अतिसंवेदनशील, अतिदुर्गम चारभट्टी या गावात पशुधनाची संख्या मोठी आहे. या भागातील पशुपालकांच्या पशुधनाला योग्य सेवा मिळावी, या हेतूने शासनाने लाखो रूपये खर्च करून चारभट्टी येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू केला. मात्र दवाखान्याच्या निर्मितीपासूनच पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. पटीबंधकाचे पदही रिक्त आहे. गेवर्धा पशुवैद्यकीय दवाखान्याचे परिचर मडावी यांची चारभट्टीच्या दवाखान्यात तात्पुरती नियुक्ती केली आहे. मात्र तेही या दवाखान्यात कायमस्वरूपी सेवा देऊ शकत नाही. पशुधन पर्यवेक्षक पी. पी. नैताम या एकाच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर गेल्या तीन वर्षांपासून येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे.
चारभट्टी गावात व परिसरात पशुधनाची मोठी संख्या असल्याने बाराही महिने चारभट्टीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांची जनावरांसह गर्दी असते. परिणामी पशुपालकांना त्रास होतो. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ पशुधन विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)