चापलवाडाच्या सरपंचाकडून असभ्य वागणूक
By Admin | Updated: November 2, 2015 01:15 IST2015-11-02T01:15:14+5:302015-11-02T01:15:14+5:30
चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ग्राम पंचायतीचे सरपंच रमेश मेकलवार यांच्याकडून गट ग्राम पंचायत चापलवाडा चक (मछली) वासीयांना असभ्य वागणूक दिली जात आहे.

चापलवाडाच्या सरपंचाकडून असभ्य वागणूक
गट ग्राम पंचायत सदस्यांचा आरोप : पत्रकार परिषदेत माहिती
घोट : चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ग्राम पंचायतीचे सरपंच रमेश मेकलवार यांच्याकडून गट ग्राम पंचायत चापलवाडा चक (मछली) वासीयांना असभ्य वागणूक दिली जात आहे. चापलवाडा चक येथील विकासकामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चापलवाडा चक येथील ग्राम पंचायत सदस्यांनी चापलवाडा चक येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.
चापलवाडा ग्राम पंचायतीचे सरपंच रमेश मेकलवार महिला व पुरूष सदस्यांना अपमानजनक वागणूक देत असून, तुम्ही मला निवडून दिले नाही, तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार नाही. शिवाय मला सांगण्याचा तुमचा काही अधिकार नाही, असे बोलून ते ग्राम पंचायत सदस्यांचा अपमान करतात तसेच ग्राम पंचायतीच्या ठरावाची योग्य अंमलबजावणी करीत नाही. गावाच्या विकासाचा ठराव देण्यास टाळाटाळ करतात. २९ आॅक्टोबरच्या मासिक सभेत ग्राम पंचायत सदस्यांचा अपमान करण्यात आला. ग्राम पंचायतीतून मागितलेल्या ठरावाची माहिती व ठराव देण्यास टाळाटाळ करण्यात आली. महिला सदस्यांना एकेरी शब्दात संबोधण्यात आले, असा आरोप चापलवाडा चक येथील ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे. चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील संरक्षक भिंतीचे बांधकाम योग्य प्रकारे करण्यात न आल्याने सरपंच गावाच्या विकासात भेदभाव करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी चापलवाडा चक येथील ग्रा. पं. सदस्यांनी केला आहे. या संदर्भात सरपंच रमेश मेकलवार यांची विचारणा केली असता, ग्राम पंचायत सदस्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असून चारही सदस्य विरोधक असल्याने त्यांच्यामुळे मागील तीन महिन्यांपासून मी सरपंच झाल्यावर नवीन काम झाले नाही. त्यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला ग्रा. पं. सदस्य कुंदा बारसागडे, रेखा कोहपरे, मंगला चिताडे, भाऊजी सातपुते तसेच गावातील माजी उपसरपंच गंगाधर रामटेके, आबाजी मोहुर्ले, भाऊराव उमरे, हरिदास कोहपरे, प्रकाश झाडे, प्रभाकर धानफोले, अशोक मेश्राम, भास्कर धुर्वे, चंद्रकांत गव्हारे उपस्थित होते. (वार्ताहर)