धान खरेदी केंद्रात केला बदल
By Admin | Updated: November 22, 2015 01:31 IST2015-11-22T01:31:17+5:302015-11-22T01:31:17+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाने मंजूर केलेले धान खरेदी केंद्र प्रचंड अंतराचे होते. यामुळे शेतकऱ्यांना २५ ते ३० किमीची पायपीट करावी लागत होती.

धान खरेदी केंद्रात केला बदल
शेतकऱ्यांसाठी सोयीचे : क्रिष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश
देसाईगंज : जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाने मंजूर केलेले धान खरेदी केंद्र प्रचंड अंतराचे होते. यामुळे शेतकऱ्यांना २५ ते ३० किमीची पायपीट करावी लागत होती. सदर प्रश्नांबाबत आमदार क्रिष्णा गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर केंद्र जवळच्या गावात देण्याची मागणी केली. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी धान खरेदी केंद्रात बदल केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता धान विक्रीसाठी होणारी २५ ते ३० किमीची पायपीट वाचणार आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाने सन २०१५-१६ या हंगामात शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी आधारभूत व एकात्मिक योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागाने आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज या तीन तालुक्यातील धान खरेदी केंद्र मंजूर केले. मात्र या केंद्रांचे अंतर २५ ते ३० किमीचे होते. यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. आमदार क्रिष्णा गजबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून धान खरेदी केंद्रात बदल घडवून आणला आहे. उराडीतील शेतकऱ्यांसाठी देलनवाडी व कुरंडी माल, वडेगाव, दवंडीच्या शेतकऱ्यांसाठी रांगी तसेच पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्र हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)