चुकीच्या याद्यांमुळे बदल्या रखडल्या
By Admin | Updated: May 29, 2017 02:36 IST2017-05-29T02:36:16+5:302017-05-29T02:36:16+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या सलग दुसऱ्या वर्षीही होत नसल्याने दुर्गम भागातील शिक्षकांची घोर निराशा झाली आहे.

चुकीच्या याद्यांमुळे बदल्या रखडल्या
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी : दुर्गम भागातील शिक्षक संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्या सलग दुसऱ्या वर्षीही होत नसल्याने दुर्गम भागातील शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या बदल्या न होण्यासाठी चुकीच्या समायोजनाच्या याद्या कारणीभूत आहेत. चुकीच्या याद्या तयार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दुर्गम भागातील शिक्षकांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या हा अतिशय किचकट व वादग्रस्त प्रश्न ठरला आहे. मार्च महिन्यामध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापक व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया राबविली. मात्र अधिकाऱ्यांनी शासन निर्णय डावलून समायोजनेच्या याद्या तयार केल्या आहे. त्यामुळे विज्ञान पदवीधर शिक्षक न्यायालयात गेले. शासन नियमात बसत नसताना सुध्दा प्रशासनाने काही शिक्षक संघटनांच्या म्होरक्यांच्या दबावात येऊन विषय शिक्षकांची भरती केली. विज्ञान पदवीधरांवर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगनादेश प्राप्त केला. समायोजनाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्यामुळे पुढच्या बदल्या करणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी सुध्दा बदल्या रद्द करावी लागली आहे. विज्ञान पदवीधरांची ३० जून ला सुनावणी आहे. तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करणे अशक्य होणार आहे.