चामोर्शी मार्ग बनले डम्पिंग यार्ड
By Admin | Updated: August 21, 2015 01:57 IST2015-08-21T01:57:50+5:302015-08-21T01:57:50+5:30
नगर परिषदेचे कर्मचारी शहरातून जमा केलेला कचरा चामोर्शी मार्गावरील विज्ञान महाविद्यालयासमोर टाकत असल्याने कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले असून...

चामोर्शी मार्ग बनले डम्पिंग यार्ड
गडचिरोली : नगर परिषदेचे कर्मचारी शहरातून जमा केलेला कचरा चामोर्शी मार्गावरील विज्ञान महाविद्यालयासमोर टाकत असल्याने कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले असून याचा त्रास महाविद्यालयातील विद्यार्थी व या मार्गाने जाणाऱ्या प्रवशांना होत आहे. कचरा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी सकाळी प्रत्येक गल्लीमध्ये फिरून घंटागाडीच्या माध्यमातून घराघरातील कचरा गोळा करतात. गोळा झालेला कचरा जवळपासच्या कचराकुंडीमध्ये किंवा नगर परिषदेच्या खरपुंडी मार्गावरील डम्पिंग यार्डवर नेऊन टाकणे आवश्यक आहे. मात्र चामोर्शी मार्गावरील विवेकानंद नगर, गोकुलनगर, कॅम्प एरिया आदी भागातून गोळा केलेला कचरा काही स्वच्छता कर्मचारी डम्पिंग यार्डवर नेऊन न टाकता, ते विज्ञान महाविद्यालयासमोर असलेल्या रस्त्याच्या बाजुला झुडूपांमध्ये नेऊन टाकत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. पाऊस आल्यानंतर दुर्गंधीचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांना सहन करावा लागत आहे.
कचरा टाकण्यासाठी नगर परिषदेचा स्वतंत्र डम्पिंग यार्ड असतानाही काही कामचुकार कर्मचारी जाणूनबुजून या ठिकाणी कचरा नेऊन टाकत आहेत. ही गंभीर बाब असून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या बाबत अनेकवेळा कचरा टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत सांगितले आहे. मात्र सदर कर्मचारी माणण्यास तयार नाही. (नगर प्रतिनिधी)