चामोर्शी-मार्कंडा मार्ग खड्ड्यात
By Admin | Updated: June 28, 2015 02:19 IST2015-06-28T02:19:35+5:302015-06-28T02:19:35+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंड्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

चामोर्शी-मार्कंडा मार्ग खड्ड्यात
अपघाताची शक्यता : डांबर उखडले
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंड्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर मार्गावर अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने भाविक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मार्र्कंडा देवस्थान चामोर्शीपासून पाच किमी अंतरावर आहे. यापूर्वी या मार्गाची दूरवस्था झाली होती. ही बाब परिसरातील नागरिकांनी बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर एक महिन्यांपूर्वी सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे.
अधिक मास असल्याने मार्र्कंडा येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. परिणामी या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहुर्ली, फराडा, घारगाव येथील नागरिक चामोर्शी येथे येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून खरेदी केलेले बियाणे बैलबंडी किंवा आॅटोच्या सहाय्याने नेली जात आहे. मात्र या मार्गावर असलेल्या खड्ड्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर मार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.
एक महिन्यापूर्वी बनविलेला मार्ग चार दिवसांच्या पावसाने उखडून गेला. त्यामुळे मार्ग दुरूस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)