चामोर्शी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
By Admin | Updated: January 30, 2016 01:47 IST2016-01-30T01:47:32+5:302016-01-30T01:47:32+5:30
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

चामोर्शी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
मुख्य रस्ते केले मोकळे : नगर पंचायत प्रशासनाचा पुढाकार
चामोर्शी : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारला नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने गडचिरोलीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खताचे ढिगारे काढून अतिक्रमण हटविण्यात आले. याशिवाय या मार्गावरील वाढलेली झाडेझुडपांची तोडणी करून रस्ते मोकळे करण्यात आले.
चामोर्शी शहरात आंतरराष्ट्रीय मार्गावर असलेल्या छोट्या-मोठ्या दुकानांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावरही दुकानांमुळे अपघातांची शक्यता वाढली होती. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याचा चामोर्शी नगर पंचायत प्रशासनाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून स्वत:हून आपले अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. चामोर्शी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनास सहकार्य करावे. तसेच अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाने केले आहे.
दुसऱ्या दिवशी शनिवारी चामोर्शीतील अंतर्गत रस्ते व नालीवरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शुक्रवारी अतिक्रमण कारवाईदरम्यान नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, आरोग्य सभापती विजय शातलवार, नगरसेवक शामराव लटारे, रामेश्वर सेलुकर, वैभव भिवापुरे व नगर पंचायतीचे कर्मचारी रमेश धोडरे, श्रीकांत नैताम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)