जुन्याच समस्यांचे आव्हान
By Admin | Updated: October 27, 2014 22:36 IST2014-10-27T22:36:10+5:302014-10-27T22:36:10+5:30
जिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात

जुन्याच समस्यांचे आव्हान
रत्नाकर बोमिडवार - चामोर्शी
जिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात या तालुक्याचा विकास फारशाप्रमाणात झाला नाही. अनेक मूलभूत समस्या अद्यापही डोके वर काढून आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासमोर जुन्याच समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे.
चामोर्शी तालुक्यात बारमाही वाहणारी वैनगंगा नदी व इतर उपनद्या आहेत. धानाचे उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यात सुपीक क्षेत्रही भरपूर प्रमाणात आहे. परंतु या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अद्यापही फारशी प्रगती करू शकला नाही. शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही सिंचनाच्या सोयी पोहोचल्या नाहीत. विदर्भाचा खजुराहो व दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडेश्वराच्या विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून मार्र्कंड्याचा विकास झाला नाही. त्यामुळे पर्यटन उद्योगाला अद्यापही चालना मिळाली नाही.
धानक्षेत्र व पर्यटनाच्या भरवशावर या विभागाचा विकास होईल, अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करीत होते. परंतु सदर अपेक्षा फोल ठरली आहे. राईस मिल उद्योगाशिवाय तालुक्यात कुठल्याही उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली नाही. बेरोजगारांच्या हाताला कामही नाही. धान उत्पादकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर वारंवार आर्थिक संकट कोसळत आहेत. आरोग्य सेवेच्याबाबतीत नवनिर्वाचित आमदार स्वत: वैद्यकीय अधीक्षक राहिल्याने त्यांच्याच ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार काय, असाही प्रश्न आहे.
चामोर्शी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाल्याशिवाय आरोग्य सेवेत सुधारणा होणार नाही, अशी जनतेची भावना आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाईचे भीषण सावट असते. अनेक किमी अंतरावरून महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागते. त्याबरोबरच चामोर्शी शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने चामोर्शीत १३२ केव्हीचे पॉवर हाऊस निर्माण करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच फिडर, डीपी अनेक ठिकाणी उभारण्याची गरज आहे. चामोर्शी-आष्टी, चामोर्शी-मूल हे दोनही रस्ते दुरवस्थेत आहेत. वाहनधारकांची हाडे खिळखिळी होतील, अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे. याबरोबरच अनेक समस्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीचेही नवीन आमदारांसमोर आव्हान आहे.