वणवा थांबविण्याचे वन विभागासमोर आव्हान
By Admin | Updated: March 10, 2017 02:18 IST2017-03-10T02:18:19+5:302017-03-10T02:18:19+5:30
मार्च महिना सुरू होताच जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी पावसाळ्यानंतर केवळ ७ मार्च रोजी थोडाफार अवकाळी पाऊस झाला

वणवा थांबविण्याचे वन विभागासमोर आव्हान
कोट्यवधींचा खर्च : घनदाट जंगलामुळे आगीची शक्यता अधिक
वैरागड : मार्च महिना सुरू होताच जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी पावसाळ्यानंतर केवळ ७ मार्च रोजी थोडाफार अवकाळी पाऊस झाला. काही तालुक्यांमध्ये तर पाऊसही पडला नाही. त्यामुळे जंगलातील गवत पूर्णपणे वाळून आहे. थोडीशीही ठिणगी पडताच त्याला वनव्याचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी वनवे थांबविणे हे वन विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.
मार्च महिन्याच्या प्रारंभापासून पूर्व विदर्भातील पानझडीच्या जंगलांना आगी लागण्याचे प्रकार घडतात. आगी लागू नये म्हणून वन विभागाच्या मार्फतीने फायरलाईन जाळली जाते. मात्र सदर उपाययोजना केवळ देखावा असल्याचे आजपर्यंत निष्पन्न झाले आहे. याबाबीवर मोठ्या प्रमाणात वन विभाग पर्यायाने शासनाचा पैसा खर्च होतो. मार्चपासून मोहफुलाचा हंगाम सुरू होते. मोहफूल विकणारे लोक झाडाखालील जागा साफ असावी, यासाठी पालापाचोळा गोळा करतात आणि त्याची ठिकाणी पालापाचोळा जाळून टाकतात. ही आग पसरत जाऊन वनव्याचे रूप धारण करते. वनवे लागण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील गवत जाळतात.
आग लावल्यानंतर आग विझविणे ही संबंधित शेतकऱ्याची जबाबदारी आहे. मात्र शेतकरी आग न विझविताच घराकडे परतात. त्यामुळे आग संपूर्ण जंगलात पसरते व आगीमुळे जंगलाचे मोठे नुकसान होते. या सर्व बाबी टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. मात्र जनजागृतीचे काम वन विभागाच्या मार्फतीने पाहिजे त्या प्रमाणात केले जात नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दाट जंगल आहे. त्यामुळे वनव्यांची समस्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अत्यंत तोकड्या असल्याचे दिसून येत आहे. वनव्याने रौद्ररूप धारण केल्यानंतर या वनव्यात दरवर्षी कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. त्यामुळे वन विभागाने आग थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)