सभापतींसमोर विकासाचे आव्हान
By Admin | Updated: September 16, 2014 23:44 IST2014-09-16T23:44:32+5:302014-09-16T23:44:32+5:30
पंचायत समितीच्या सभापतिपदी शशिबाई बंडू चिळंगे तर उपसभापतीपदी केशव मसा भांडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त सभापती व उपसभापती दोघेही स्वच्छ प्रतिमेचे मानले जातात.

सभापतींसमोर विकासाचे आव्हान
लोमेश बुरांडे - चामोर्शी
पंचायत समितीच्या सभापतिपदी शशिबाई बंडू चिळंगे तर उपसभापतीपदी केशव मसा भांडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त सभापती व उपसभापती दोघेही स्वच्छ प्रतिमेचे मानले जातात. पंचायत समितीमध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्या सोडवून विकासकामे करण्याचे आव्हान सभापती व उपसभापतींना पेलावे लागणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून चामोर्शीची ओळख आहे. या तालुक्यात १८६ गावे असून ७६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६५ हजार ५१४ एवढी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील इतर तालुके ज्याप्रमाणे विकासापासून वंचित आहेत. त्याला चामोर्शी तालुकासुद्धा अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील बहुतांश गावांपर्यंत अजूनही आरोग्य, शिक्षण, रस्ते, विद्युत, सिंचन, कृषी आदी सुविधा पोहोचल्या नाहीत. शासन व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचारी मानत नाही. तालुक्यातील जवळपास ९० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वेळेवर काम होत नाही. आलेल्या नागरिकांना परत जावे लागते. अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी हा वादाचा मुद्दा बनला आहे. नवनिर्वाचित सभापती शशिबाई चिळंगे व उपसभापती केशव भांडेकर हे दोघेही स्वच्छ प्रतिमा असलेले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. याच बळावर त्यांची अविरोध निवड करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणत प्रशासनात गतिमानता आणण्याचे मोठे आव्हान सभापती व उपसभापतींसमोर आहे. अडेलतट्टू धोरणामुळे नागरिकांच्या मनात अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या नागरिकांचे कधीच एका दिवशी काम होत नाही. हे प्रशासनाचे धोरणच बनले आहे. ही सवय बंद करावी लागणार आहे. विकास कामांचे योग्य नियोजन करून ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचतील यासाठी विशेष प्रयत्न करावा लागणार आहे. एकंदरीतच सभापती व उपसभापती पदाचा मुकूट मिळाला असला तरी सदर मुकूट काटेरी आहे. हे सुद्धा नाकारता येत नाही. जनता व पं. स. सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासास पात्र ठरावे लागणार आहे.