रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:28+5:302015-12-05T09:07:28+5:30

जोगीसाखरा ते आरमोरी मार्गाचे डांबरीकरण व रूंदीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी जोगीसाखरा, पळसगाव, शंकरपूर, कासवी या ग्रामपंचायती अंतर्गत ....

The Chakkajam movement demanded for road repair | रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन

रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन

शेकडो नागरिकांचा सहभाग : आरमोरी-जोगीसाखरा मार्ग दुरूस्त करा
आरमोरी : जोगीसाखरा ते आरमोरी मार्गाचे डांबरीकरण व रूंदीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी जोगीसाखरा, पळसगाव, शंकरपूर, कासवी या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावातील शेकडो नागरिकांनी शुक्रवारी १२.३० वाजता आरमोरी-गडचिरोली मार्गावरील भगतसिंग चौकात चक्काजाम आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील एक तास वाहतूक ठप्प पडली होती.
जोगीसाखरा ते आरमोरी हा सात किमीचा मार्ग मागील १५ वर्षांपासून दुरूस्त करण्यात आला नाही. त्यामुळे सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मार्ग अरूंद असल्याने या मार्गावर दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास फार मोठी अडचण निर्माण होते. खड्डे वाचविताना आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. अरूंद रस्ता व नागमोडी वळणामुळेही अनेक अपघात झाले आहेत. या मार्गाची दुरूस्ती करावी तसेच मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र प्रशासनाने या मार्गाच्या दुरूस्तीकडे कायमचे दुर्लक्ष केले. या मार्गावर पळसगाव, शंकरनगर, कासवी ही गावे येतात. दर दिवशी शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी या मार्गाने सायकलने प्रवास करतात. मात्र मार्ग दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान नागरिकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनस्थळी बांधकाम विभागाचे अधिकारी येणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. आंदोलकांची आक्रमकता लक्षात घेऊन आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देसाईगंजचे अभियंता अविनाश मोरे, शाखा अभियंता फाले, उंदीरवाडे, झापे हे आंदोलनस्थळी दाखल होऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तीन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविले जातील. रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरणाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता मोरे यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनाचे नेतृत्व भाकपाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, देवराव चवळे, भिमराव मेश्राम, दिलीप घोडाम, आसाराम प्रधान, मिलिंद खोब्रागडे, मोहिनी वरखडे, युवराज सपाटे, सोपानदेव गेडाम, भूषण खंडाते, शालिक पत्रे, मंगरू वरखडे, वृंदा गजभिये, शामराव सहारे, सुजीत मिस्त्री यांनी केले. आंदोलनाला माजी आमदार आनंदराव गेडाम यांनीही भेट दिली. (वार्ताहर)

Web Title: The Chakkajam movement demanded for road repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.