आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी साखळी उपोषण
By Admin | Updated: October 3, 2015 01:25 IST2015-10-03T01:25:24+5:302015-10-03T01:25:24+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड कार्यालयांतर्गत येत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून देण्यात आले नाही.

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी साखळी उपोषण
भामरागड प्रकल्प : अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचा सहभाग
भामरागड : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड कार्यालयांतर्गत येत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून देण्यात आले नाही. प्रकल्प कार्यालयाच्या दफ्तर दिरंगाईच्या विरोधात आश्रमशाळा कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून झाले नाही. वेतनाबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करण्यात आल्या. मात्र वेतन काढण्यासंदर्भात प्रकल्प कार्यालयाने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे कर्मचारीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. प्रकल्प अधिकारी वेतनाची तारीख निश्चित करून लेखी स्वरूपात माहिती देणार नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
३ आॅक्टोबर रोजी प्रकल्प अधिकारी व लेखापाल प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत वेतनाबाबत चर्चा करतील, अशी आशा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. साखळी उपोषणाला मुख्याध्यापक महादेव बासनवार, डॉ. विलास तळवेकर, शाईन अल्ली सय्यद, गोटे, दिलीप मांगलेकर, सेलोकर, वानखेडे, झोडे, ठावरी, चतूर, कसारे, मुलकलवार, झाडे, निनावे, उरकुडे, सूरजागडे, गुट्टेवार, आत्राम, जलील शेख, गेडाम, धानोरकर, दुधबळे, कापसे, दोनाडकर, शेख, पवार आदी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)