खाेट्या स्वाक्षऱ्या करून दिले नाहरकत प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST2021-02-20T05:44:46+5:302021-02-20T05:44:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेरची : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत बाेरी येथील नागरिकांनी ग्रामसेवक व सरपंचाला विकास कामांचा हिशेब ग्रामसभेत अनेकदा ...

खाेट्या स्वाक्षऱ्या करून दिले नाहरकत प्रमाणपत्र
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेरची : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत बाेरी येथील नागरिकांनी ग्रामसेवक व सरपंचाला विकास कामांचा हिशेब ग्रामसभेत अनेकदा मागितला. हिशेब न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी १२ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीला कुलूपही ठाेकले. त्यानंतर पाच-सहा दिवसांनी थाेडीफार माहिती मिळाली. ग्रा.पं. सदस्यांच्या खाेट्या स्वाक्षऱ्या करून बाेरी गावात पाेल्ट्रीफार्मच्या बांधकामाला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे.
येत्या १५ दिवसांत ग्रामसेवकांनी विकास कामांच्या निधीचा परिपूर्ण हिशेब द्यावा, अन्यथा बाेरी ग्रामपंचायतीला पुन्हा कुलूप ठाेकू, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले. सरपंच व ग्रामसेवक, तसेच या संबंधात असलेल्या व्यक्तींना बाेलावून १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण हिशेब देण्यात येईल, असे आश्वासन दिले हाेते; परंतु हिशेब न मिळाल्याने नागरिकांमध्ये आणखी राेष वाढला. दरम्यान, नागरिकांनी अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक एस.जी.मडावी व माजी सरपंच कल्पना नैताम व माजी उपसरपंच सावजी बाेगा यांना घेराव घातला. सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीतील शासकीय याेजनांमधून झालेल्या कामांचा, तसेच प्राप्त निधी व खर्चाचा हिशेब मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ दिवसांची मुदत मागितली. १५ दिवसांनंतरही अर्धवट माहिती मिळाली. खाेट्या स्वाक्षऱ्या करून पाेल्ट्रीफार्मच्या बांधकामाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. या नाहरकत प्रमाणपत्राबाबत ग्रा.पं.च्या सहा सदस्यांना कुठलीच कल्पना नाही, असे या माहितीवरून स्पष्ट झाले.
या सहा सदस्यांनी नाहरकत प्रमाणपत्रावर आम्ही स्वाक्षरीच केली नसल्याचे ग्रामस्थांसमाेर सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आणखी गाेंधळ निर्माण झाले. दरम्यान, कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पं.स. विस्तार अधिकारी राजेश फाये, हकीम पठाण, ग्रामसेवक एस.जी. मडावी यांच्यासह माजी सरपंच व उपसरपंचांना जाब विचारण्यात आला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. पाेल्ट्रीफार्म बांधकामाबाबत आम्ही तीन दिवसांत माहिती देऊ, तसेच उर्वरित विकास कामांची माहिती १५ दिवसांत देण्याचे ग्रामस्थांसमाेर कबूल केले. १५ दिवसांत माहिती न मिळाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठाेकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.