भटक्या विमुक्त जमातींची जनगणना करा
By Admin | Updated: April 27, 2016 01:27 IST2016-04-27T01:27:59+5:302016-04-27T01:27:59+5:30
राज्यभरातील भटक्या विमुक्त जमातींची जनगणना करून या समाजातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या,

भटक्या विमुक्त जमातींची जनगणना करा
चामोर्शी : राज्यभरातील भटक्या विमुक्त जमातींची जनगणना करून या समाजातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा राज्यभरात आंदोलन तीव्र केला जाईल, असा इशारा भटके विमुक्त परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिला आहे.
भटक्या विमुक्त जमातीच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत घालून त्यांना वसतिगृहाची सुविधा निर्माण करून द्यावी, बेरोजगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मदत करण्यात यावी, जनावरांना चराईसाठी राखीव कुरण ठेवावे, कैकाडी समाजाला बीपीएल व आधारकार्ड सुविधा उपलब्ध करून द्याव्या, चामोर्शी तालुक्यातील मच्छीमारांसाठी जागा राखीव ठेवाव्या, नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी शासनाकडे लढा सुरू असल्याचे पत्रकार परिषदेरम्यान सांगितले. यापुढे प्रत्येक गावात संघर्षवाहिनीची शाखा स्थापन केली जाईल व समाजात जनजागृती केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ११ टक्के स्वंतत्र आरक्षण देण्यात यावे, या समाजासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे, मच्छीमारांच्या संस्थांना संरक्षण द्यावे, घरकूल योजनेपासून वंचित राहिलेल्या समाजातील युवकांना घरकूल उपलब्ध करून द्यावे, वनहक्क कायद्याअंतर्गत मासेमारीचे हक्क मच्छीमार समाजाला द्यावे, पट्ट्यांचे वाटप करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन तीव्र्र करण्याचा इशारा पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आला.
पत्रकार परिषदेला सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी पी. जे. सातार, मनमोहन बंडावार, हरीश गेडाम, प्रमोद एडलावार, मारोती आग्रे, सुरेश गुंतीवार, किरण आकुलवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)