रूग्णालयावर सीसीटिव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 01:33 IST2017-01-15T01:33:47+5:302017-01-15T01:33:47+5:30
स्थानिक ग्रामीण रूग्णालयात तब्बल १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.

रूग्णालयावर सीसीटिव्हीची नजर
एटापल्लीत लागले १३ कॅमेरे : कामचुकार कर्मचाऱ्यांना लगाम लागणार
एटापल्ली : स्थानिक ग्रामीण रूग्णालयात तब्बल १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. रूग्णालयाच्या बाहेरच्या परिसरात एक मोठा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला असून सदर कॅमेरा फिरता आहे. तब्बल ५०० ते ४०० मीटरच्या परिसरातील दृश्य या सीसीटीव्ही कॅमेरात कैद होणार आहे. रूग्णालयाच्या आत १२ कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर नजर राहणार आहे.
राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रूग्णालयाच्या कामकाजावर मोठा फरक दिसून येणार आहे. रूग्णालयातून बाळाची अदलाबदल झाल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी शासनाने कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज उपयोगी पडणार आहेत. डॉक्टरांच्या दुर्लक्षितपणामुळे रूग्ण दगावल्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. सदर कारणाने रूग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण होत होती. दरम्यान रूग्णालयात उपचार सुरू असतानाच आरोपी पसार होत होते. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात कॅमेरे बसविण्यात आले. तब्बल पाच लाख रूपये खर्च करून एटापल्लीच्या रूग्णालयात कॅमेरे बसविले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
एलसीडीतून नियंत्रण
एटापल्ली रूग्णालयाच्या प्रत्येक वार्डात, कार्यालय, ओपीडी व इतर परिसरात एकूण १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात एलसीडी लावण्यात आले असून संपूर्ण दृश्य येथून पाहता येते.