सिरोंचात रेती तस्करीवर सीसीटीव्हीची नजर
By Admin | Updated: February 19, 2017 01:14 IST2017-02-19T01:14:24+5:302017-02-19T01:14:24+5:30
गोदावरी नदी घाटावरून तेलंगणा राज्यात होणारी रेतीची तस्करी थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने गोदावरी नदीच्या पुलावर

सिरोंचात रेती तस्करीवर सीसीटीव्हीची नजर
महसूल प्रशासनाचा निर्णय : गोदावरी पुलावर लागले कॅमेरे
सिरोंचा : गोदावरी नदी घाटावरून तेलंगणा राज्यात होणारी रेतीची तस्करी थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने गोदावरी नदीच्या पुलावर चौकीनजीक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तहसील कार्यालयात यासाठी स्वतंत्र मॉनिटरींग कक्ष निर्माण करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रकवर नजर राहणार असल्याने रेती तस्करीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तेलंगणा व महाराष्ट्र यांच्या सीमा रेषेवर असलेल्या गोदावरी नदीमध्ये तेलंगणा राज्याच्या बाजुला पाणी आहे. तर महाराष्ट्राच्या बाजुला रेती असल्याने या रेतीवर महाराष्ट्र शासनाचा अधिकार आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील रेती घाटांची विक्री गडचिरोली महसूल विभागाने केली आहे.
गोदावरी नदीवरील पूल झाल्यापासून मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यात अवैधरितीने रेतीची तस्करी केली जात आहे. आजपर्यंत महसूल प्रशासनाने अनेकवेळा कारवाई करून रेती तस्करांच्या मुस्क्या दाबण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही रेती तस्करीवर पूर्णपणे आळा घालता येणे शक्य झाले नाही.
गोदावरी पुलावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर ठेवता यावी, यासाठी महसूल प्रशासनाने आता पुलानजीक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरांचे मॉनिटरींग कक्ष सिरोंचा तहसील कार्यालयात उभारण्यात आले आहे. या भागातून जाणाऱ्या प्रत्येक ट्रकला सीसीटीव्हीच्या नजरेतूनच जावे लागणार आहे. प्रत्येक ट्रकची या ठिकाणी नोंद घेतली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरा खांबावर अगदी वरच्या बाजुला लावण्यात आला असल्याने ओव्हरलोड रेती वाहतुकीवरही नियंत्रण ठेवण्यास फार मोठी मदत होणार आहे. नियमांचा भंग करणाऱ्या सदर ट्रकवर कारवाई करण्यास सीसीटीव्ही कॅमेरांमुळे सोपे जाणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
धर्मकाटाही लागणार
काही ट्रकमधून ओव्हरलोड रेतीची वाहतूक केली जात असल्याचे महसूल प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोदावरी नदी पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलावरून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी तेलंगणा राज्याने त्यांच्या सीमेवर धर्मकाटा उभारला आहे. धर्मकाट्यावर ट्रकचे वजन केल्यानंतरच सदर ट्रक पुलावरून सोडला जातो. महाराष्ट्राच्या सीमेवरही धर्मकाटा लावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.