वीज बिल थकल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद
By Admin | Updated: April 11, 2017 00:56 IST2017-04-11T00:56:10+5:302017-04-11T00:56:10+5:30
राजनगरी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळख असलेल्या अहेरी येथील सीसीटीव्ही कॅमेरे वीज बिल भरणा न करण्यात आल्याने मागील एक महिन्यापासून बंद पडून आहेत.

वीज बिल थकल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद
अहेरीतील प्रकार : नगर पंचायतीने ३० हजाराच्या बिलाचा भरणा केला नाही
विवेक बेझलवार अहेरी
राजनगरी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळख असलेल्या अहेरी येथील सीसीटीव्ही कॅमेरे वीज बिल भरणा न करण्यात आल्याने मागील एक महिन्यापासून बंद पडून आहेत. मात्र नगर पंचायतीच्या बैठकीत चर्चा न झाल्याने बिल भरण्यात आले नाही.
१५ आॅक्टोबरला अहेरी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेराची सेवा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा अहेरीत सुरू झाली होती. या सेवेमुळे अहेरी गावातील संपूर्ण घटनाक्रमावर पोलिसांना नजर ठेवणे सोयीचे झाले होते. अहेरी शहरात गर्दीच्या २४ ठिकाणावर या कॅमेराची नजर राहत होती. अहेरी न्यायालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, राजे विश्वेश्वरराव महाराज चौक, मस्जिद चौक, दानशूर चौक, आझाद चौक व राजवाडा मार्गासह इतर ठिकाणी २४ कॅमेरे लावण्यात आले. परिणामी भुरट्या चोरीचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते. सीसीटीव्ही कॅमेराचे सात वेगवेगळे मीटर अहेरी नगर पंचायतीच्या नावाने लावण्यात आले होते. या सातही मीटरचे मिळून जवळजवळ ३० हजार रूपयांचे बिल नगर पंचायतीला प्राप्त झाले. नगर पंचायतीने महावितरण कंपनीकडे मार्च महिन्यात बिल न भरल्याने या सीसीटीव्ही कॅमेराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. महिना उलटूनही कॅमेरे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे अहेरीची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर आहे. पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेराची मोठी मदत होत होती, असे सांगण्यात येत आहे.
पहिलीच योजना ठरली फेल
अहेरीसह सर्व तालुका व जिल्हा मुख्यालय गडचिरोलीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना पालकमंत्र्यांच्या आग्रहामुळे तयार करण्यात आली आहे. मात्र अहेरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरेच्या वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाल्याने पहिलीच प्रायोगीक तत्वारील योजना बंद पडली आहे. त्यामुळे इतर शहरांनाही सीसीटीव्ही कॅमेराचा आर्थिक भार किती सोसेल हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अहेरी नगर पंचायतीच्या विशेष सभेत सीसीटीव्ही कॅमेराच्या वीज बिल भरण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र सदस्याकडून त्या विषयाला स्थगीत ठेवण्यात आल्याने ते बिल भरण्यात आले नाही. पुढे होणाऱ्या बैठकीत हा विषय पुन्हा ठेवला जाणार आहे. त्यावर सर्वानुमते योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- डॉ. कुलभुषण रामटेके, मुख्याधिकारी नगर पंचायत अहेरी