दुर्गम मसेली गावाने घेतली काेविड लसीकरणात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:34+5:302021-05-26T04:36:34+5:30
गडचिराेली : काेरची तालुक्यातील बाेटेकसा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत मसेली गावातील नागरिकांनी काेविड लसीकरणाच्या माेहिमेस भरघाेस प्रतिसाद दिला. लसीकरणात उत्कृष्ट ...

दुर्गम मसेली गावाने घेतली काेविड लसीकरणात भरारी
गडचिराेली : काेरची तालुक्यातील बाेटेकसा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत मसेली गावातील नागरिकांनी काेविड लसीकरणाच्या माेहिमेस भरघाेस प्रतिसाद दिला. लसीकरणात उत्कृष्ट प्रतिसाद दिल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेऊन गावासाठी दहा लाख रुपयांचे आरओ व वाॅटर एटीएम मंजूर केले.
येत्या काही दिवसांत मसेलीवासीयांना थंड व शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध हाेणार आहे. महाराष्ट्रात सध्या काेविडचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णसंख्येमध्ये सर्वत्र प्रचंड वाढ झालेली आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्यात या राेगावर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. काेविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययाेजना म्हणून शासनाने लसीकरण माेहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व आराेग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व काेराेना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहावे. हा या माेहिमेचा मुख्य उद्देश आहे. परंतु काही विघ्नसंताेषी लाेकांकडून पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे लाेक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.
बाेटेकसा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत मसेली गावामध्ये एकूण एक हजार २१४ लाेकांनी काेराेनाचा डाेस घेतला. मसेलीचे वैद्यकीय अधिकारी नरेंद्र खाेबा यांच्यासह आराेग्य विभागाच्या चमूने स्थानिक लाेकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन लसीकरण माेहीम राबविली. बीडीओ डी.एम. देवरे, तहसीलदार छगनलाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली टीएचओ डाॅ. विनाेद मडावी यांच्याशी चर्चा करून ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांच्या मदतीने गावामध्ये काेविडचे लसीकरण करण्यात आले. याकरिता जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
बाॅक्स .....
लसीकरण वाढवा, लाभ घ्या : सीईओ
काेरची तालुक्यातील मसेली गावाची काेराेना लसीकरणाची टक्केवारी अधिक असल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा खनिकर्म निधी या अंतर्गत मसेली गावात दहा लाख रुपयांचे आरओ तसेच वाॅटर एटीएम मंजूर करण्यात आले आहे. काेरची तालुक्यासह जिल्ह्यातील इतर गावांनी मसेली गावाचा आदर्श बाळगून काेविड लसीकरणात भरीव कामगिरी करावी. १०० टक्के लसीकरण हाेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. जेणेकरून संबंधित गावाला दहा लाख रुपयांचे आरओ व वाॅटर एटीएम उपलब्ध हाेईल, असे सीईओ आशीर्वाद यांनी म्हटले आहे. मसेली गावात आरओ व वाॅटर एटीएम बसविण्यासाठीची कार्यवाही ग्रामीण पाणीपुरवठा विभाग लवकरच हाती घेणार आहे. जेणेकरून येथे शुद्ध व थंड पाणी उपलब्ध हाेईल.