गुरांनी लावली रहदारीची ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:34+5:30
अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी येतात. प्रसंगी अपघातसुद्धा घडू शकतो.

गुरांनी लावली रहदारीची ‘वाट’
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकिसा : पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी मोकाट जनावरांच्या हैैदोसाचा सामना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना करावा लागतो. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र सारखीच स्थिती असते. मात्र अंकिसा परिसरात याहून स्थिती अधिक बिकट आहे. येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आधीच वाहनांची प्रचंड वर्दळ असताना मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. काही दिवसांपासून येथे मोकाट जनावरांनी हैैदोस घातल्याने रहदारीची ‘वाट’ लागली आहे. संरक्षणासाठी अनेक दुकानदारांना प्रतिष्ठाणासमोर बांबूचे कुंपण करावे लागले आहे.
अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी येतात. प्रसंगी अपघातसुद्धा घडू शकतो. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ग्रामीण स्तरावर काहीच उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावरून गिरट्या घालत असतात.
गावातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या सभोवताल बांबूंचे कुंपण करून बंदोबस्त केला आहे. मोकाट जनावरांपासून त्यांच्या मालाचे संरक्षण होत असले तरी इतरांचे काय? असा सवाल होत आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदारी कुणाची?
अंकिसा येथील महामार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशास्थितीत येथे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुराख्यांची टंचाई भासत असल्याने जनावरे मोकाट राहतात. परिणामी अनेक शेतकरी अनावश्यक जनावरे कसायांना विक्री करतात.