वृक्षतोड झाल्यास ‘चिपको आंदोलन’ करू
By Admin | Updated: February 20, 2016 02:14 IST2016-02-20T02:14:21+5:302016-02-20T02:14:21+5:30
सावलखेडा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ३० व ३२ वनक्षेत्रातील १० हजार हेक्टर जागेवरील जंगलाची ग्रामसभेची परवानगी न घेता ...

वृक्षतोड झाल्यास ‘चिपको आंदोलन’ करू
वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
कुरखेडा : सावलखेडा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ३० व ३२ वनक्षेत्रातील १० हजार हेक्टर जागेवरील जंगलाची ग्रामसभेची परवानगी न घेता वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या वृक्षतोड केली आहे.
या वृक्षतोडीस सावलखेडावासीयांना थांबविले. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व पुन्हा वृक्षतोड केल्यास ‘चिपको आंदोलन’ करणार असल्याची माहिती बुधवारी कुरखेडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत वनहक्क सनियंत्रण समितीचे अध्यक्ष यशोधन मडावी, सचिव भास्कर दडमल, माजी सरपंच पुरूषोत्तम दडमल, काशिनाथ दोनाडकर, वनहक्क समितीचे अध्यक्ष गुणवंत दडमल, सचिव धोंडूजी धोटे, नानाजी पुराम, गजानन ढोक, सुभाष ढोरे, यशवंत कुथे, लोकनाथ उईके, मुखरू राऊत, दिलेश्वर कवाडकर, शालीक कुमरे, रोशन चौधरी यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत सावलखेडावासीय म्हणाले की, अधिनियम १९९६ व अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वनहक्काची मान्यता सन २००८ सुधारित नियम २०१२ अंतर्गत मान्यता प्राप्त ग्रामसभा सावलखेडाच्या पारंपारिक सीमाअंतर्गत वनक्षेत्रातील उत्कृष्ट जंगालाची, वन्यप्राण्यांचे आश्रय असलेल्या व गौण वन्यजैवांची वन विकास महामंडळाने ग्रामसभेची परवानगी न घेता वृक्षतोड करून गा्रमसभेच्या अधिकाराची पायमल्ली केली आहे. त्यामुळे वन विकास महामंडळाने सुरू केलेली वृक्षतोड संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून ३१ जानेवारीला थांबविली. त्याअनुषंगाने १६ फेब्रुवारी रोजी वन विकास महामंडळाचे अधिकारी आणि गावकऱ्यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या उपस्थितीत येथील मंदिरात ग्रामसभा बोलाविली होती. या सभेत कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र ठाणेदार ढवळे यांनी तुम्ही जर काम अडविले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील, अशी धमकी दिली. एकूणच वन महामंडळाची यंत्रणा पोलिसांना हाताशी धरून वृक्षतोड करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास चिपको आंदोलन केले जाईल, असेही ग्रामस्थ म्हणाले.