वृद्ध आजीवर नातवांच्या संगोपनाची धुरा
By Admin | Updated: August 20, 2016 01:25 IST2016-08-20T01:25:42+5:302016-08-20T01:25:42+5:30
पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही.

वृद्ध आजीवर नातवांच्या संगोपनाची धुरा
मुन्ना तलांडीची मुले झाली निराधार : कुटुंबीय शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत
रमेश मारगोनवार भामरागड
भामरागड : पर्लकोटा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुन्ना तलांडी यांचा मृतदेह १३ दिवसांचा कालावधी उलटूनही मिळाला नाही. मृतदेह न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वीच माहेरी निघून गेली. मुन्नाही पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे मुन्ना तलांडीची मुले निराधार झाले असून वृद्ध आजीवर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली आहे.
पर्लकोटा नदीला ७ आॅगस्ट रोजी पूर आला होता. पुरामुळे मुन्ना तलांडी हा हेमलकसा येथे अडकला होता. सतत चार दिवस मुलांपासून दूर राहल्यामुळे मुन्ना तलांडी त्रस्त झाला होता. मुलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देत नसल्याने पर्लकोटा नदीचा पूर पोहून जाण्याचा धाडसी निर्णय तलांडीने घेतला. पर्लकोटा नदीच्या पुलावरून कंबरभर पाणी वाहत असताना त्याने नदी पात्रात उडी घेतली. नदी किनाऱ्यावरच्या नागरिकांना मुन्ना नदीपात्रात बऱ्याच अंतरावर पोहतांना दिसला. त्यानंतर काही दूर अंतरावरून तो अचानक गायब झाला. तेव्हापासून १३ दिवसांचा कालावधी उलटूनही त्याचा मृतदेह पोलीस प्रशासनाच्या हातात लागला नाही. मृतदेह मिळाल्याशिवाय त्याला प्रशासन मृतक घोषित करण्यास नकार देत आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर जी मदत मुन्नाच्या कुटुंबाला मिळायला पाहिजे होती ती मिळण्यास अडचण जात आहे. पोलिसांनीही त्याचा शोध थांबविला आहे. मात्र मुन्नाची वृद्ध आई व त्याचे नातेवाईक इंद्रावती नदीच्या पात्रात त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजुनपर्यंत त्याचा मृतदेह हाती लागलेला नाही.
मुन्नाची मोठी मुलगी साक्षी ही सातव्या वर्गात शिकत आहे. तर दुसरा मुलगा सतीश हा दुसऱ्या वर्गात शिकत आहे. मुन्नाची पत्नी दोन वर्षांपूर्वी माहेरी निघून गेली. वडीलही पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे मुन्नाचे दोन्ही मुले निराधार झाले आहेत. वृद्ध आजी त्यांचा संगोपन सध्य:स्थितीत करीत आहे. आईवडिलांविना जीवन जगण्याची पाळी साक्षी व सतीशवर आली आहे. मुन्नाचे कुटुंब मुन्नाच्या मोलमजुरीवरच्या उत्पन्नावरच जगत होते. मात्र मुन्नाच्या जाण्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधनच संपले आहे. त्यामुळे त्याच्या मुलांवर व आईवर उपासमारीची पाळी आली आहे. मृतदेह न मिळाल्याने शासकीय मदतीची दारेसुद्धा सध्य:स्थितीत बंद झाली आहेत. त्यामुळे तिघांचेही जगणे कठिण झाले असून सदर कुटुुंब मदतीची अपेक्षा करीत आहेत. म्हातारपणात मजुरी करून स्वत:चेच पोट भरणे अशक्य असतानाच आता नातवांचेही पोट भरण्याची जबाबदारी वृध्द आजीवर आली आहे. तिघेही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.