पालकांची कारमेल विद्यालयावर धडक
By Admin | Updated: April 17, 2016 01:04 IST2016-04-17T01:04:48+5:302016-04-17T01:04:48+5:30
पालकसभेत ठरलेल्या निर्णयानुसार जवळपास ३०० पालकांनी शनिवारी येथील कारमेल विद्यालयावर धडक दिली.

पालकांची कारमेल विद्यालयावर धडक
३०० पालकांची उपस्थिती : टीसी काढण्याचा दिला इशारा
देसाईगंज : पालकसभेत ठरलेल्या निर्णयानुसार जवळपास ३०० पालकांनी शनिवारी येथील कारमेल विद्यालयावर धडक दिली. दरम्यान येथील महिला शिक्षीकेने पालकांबद्दल अपशब्द उच्चारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. गडचिरोली कारमेल विद्यालयाच्या फादरने पालकांसोबत चर्चा करून निवेदन स्वीकारले. संस्था व पालक यांची २४ एप्रिल रोजी संयुक्त सभा ठेवण्यात आली आहे.
येथील कारमेल विद्यालयाच्या प्रशासनामुळे पालकवर्ग कमालीचे त्रस्त झाले आहेत. शिक्षण शुल्काची रक्कम अदा करण्यास पालकांकडून विलंब झाल्यास त्या विद्यार्थ्याला शिक्षा दिली जाते. पालकांनी विरोध केल्यास याचा त्रास विद्यार्थ्यांनाच दिल्या जातो. प्रत्येक वर्षी स्वत:चीच मर्जी राखत शिक्षण शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे. विद्यालयाच्या या कारभारामुळे पालकवर्ग तसेच विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
विद्यालय प्रशासनाच्या विरोधात शनिवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जवळपास ३०० पालक सहभागी झाले होते. मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या गडचिरोली येथील कारमेल विद्यालयाच्या प्राचार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी २४ एप्रिल रोजी व्यवस्थापन व पालक यांची सभा आयोजित केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक टीसी काढण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)
या आहेत पालकांच्या मागण्या
दरवर्षी अॅडमिशन व मेंटनन्सच्या नावाखाली घेण्यात येणारे शुल्क बंद करावे, अहर्ताधारक विषयानुसार शिक्षकांची नेमणूक करावी, जाहिरातीद्वारेच शिक्षकांची नेमणूक करावी, पाठ्यपुस्तकांचे पक्के बिल द्यावे, पुस्तकावरील छापील किंमत व प्रत्यक्ष घेतली जाणारी किंमत यामधील तफावत दूर करावी, प्रत्येक महिन्याला पालकसभा आयोजित करावी, शुल्काबाबत पालकांना विचारणा करावी, विद्यार्थ्यांना याबाबत त्रास देऊ नये, विद्यार्थ्यांची पटसंख्या शालेय धोरणानुसार असावी, २५ टक्के प्रवेश देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.